नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करत असलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना

तालुक्यातील कुकाणा येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून कुकाणा येथील एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल दत्तात्रय बुचकूल यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, कुकाणा पोलीस दूरक्षेत्रासमोर विमास्क फिरणार्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचेकडून 100 रुपये दंड वसूल करत असताना 24 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास कुकाणा गावातील प्रकाश उर्फ बाळू मारुती साळुंके हा तोंडाला मास्क न लावता रोडने पायी चालत आला.

त्यास तुम्ही विनामास्क आहात. त्यामुळे 100 रुपये दंड करण्यात येत असून पावती घ्या असे म्हणालो असता तो आम्हाला शिवीगाळ करून तेथून पळून गेला. काही वेळाने तो पुन्हा तेथे हातात लाकडी दांडा घेऊन आला. हातातील दांड्याने त्याने मारले. मला सोडविण्यासाठी पोलीस नाईक काळे व कॉन्स्टेबल श्री. गलधर हे मध्ये आले असता त्यांनाही लाकडी दांड्याने मारहाण केली. तुम्ही मला ओळखत नाही. मी कुकाण्याचा डॉन आहे. माझ्या नादी लागलात तर तुमचा एकएकाचा काटा काढील अशी धमकी दिली.

या फिर्यादीवरून प्रकाश ऊर्फ बाळू मारुती साळुंके (वय 40) रा. कुकाणा याच्यावर भारतीय दंड विधान कलम 353, 332, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.