हॉर्न का वाजविला? असे विचारल्याने एकास मारहाण; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

हॉर्न का वाजविला? असे विचारल्याने एकास मारहाण; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात बाजारतळ भागात एमजीएम भंगार दुकानासमोर गाडीचा हॉर्न वाजविला या कारणावरून एक़ास लोखंडी पाईपने हातावर व पायावर मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकास पकडले असून दुसरा पसार आहे.

शहरातील बाजारतळ भागात एमजीएम भंगार दुकानासमोर महेंद्र झायलो गाडी नं. एमएच 20 सीएच 5475 हिच्यामधून जाणारे किरण धोत्रे, सागर म्हस्के, यांनी गाडीचा हॉर्न वाजविला. तेव्हा तेथे असलेला समीर लतीफ पिंजारी (वय 24) रा. वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली, श्रीरामपूर हा म्हणाला की, तुम्हाला जाण्यासाठी रस्ता रिकामा आहे. हॉर्न वाजवू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघा जणांनी शिवीगाळ करीत आज तुझा शेवटचा दिवस आहे, तुला संपवून टाकतो, असे म्हणत भंगारच्या दुकानासमोर पडलेला लोखंडी पाईप घेऊन हातावर व पायावर मारला. अंगावर धावून जाऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात हाताला जखम झाली. जाताना तू आज वाचला परत आमच्या नादी लागला तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिकारी डॉ. दिपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट देऊन पहाणी करत चौकशी केली.

याप्रकरणी समीर लतीफ पिंजारी या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी किरण धोत्रे, सागर म्हस्के, (दोघे रा. बाजारतळ, वॉर्ड नं. 3 श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध भा.दं.वि. कलम 307, 504, 506 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस सहायक निरीक्षक घायवट हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.