अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भाजीपाला विक्री करणार्या माय- लेकीला लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी विळद (ता. नगर) शिवारातील डोंगरेवस्ती येथे घडली. मंदा साहेबराव जगधने (वय 45) व त्यांच्या आई कांताबाई राऊजी नेटके अशी जखमींची नावे आहेत.
त्यांच्यावर सुरूवातीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान मंदा जगधने यांनी एमआयडीसी पोलिसाना दिलेल्या जबाबावरून सोन्या अशोक भोसले (रा. डोंगरेवस्ती, विळद) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी फिर्यादी व त्यांच्या आई डोंंगरेवस्ती येथील दुकानावर भाजीपाला विक्री करत असताना त्याठिकाणी सोन्या भोसले हा आला व त्यांना म्हणाला,‘पूर्वी केलेल्या तक्रारीमध्ये पिन्या भोसले याचे नाव का टाकले नाही,’ असे म्हणून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या आईला दुकानातील लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार टेमकर अधिक तपास करीत आहेत.