शिवीगाळ केली.. दोघांनी घेतला एकाचा जीव
सार्वमत

शिवीगाळ केली.. दोघांनी घेतला एकाचा जीव

भिंगारजवळील बाराबाभळी येथील घटना

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शिवीगाळ केली म्हणून दोघांनी एकाला दारू पाजून त्याची मान व छाती दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना भिंगार शहराजवळील बाराबाभळी येथे घडली. रावसाहेब कुंडलिक दारकुंडे (रा. शहापूर, ता. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. भिंगार पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून दोघांना अटक केली आहे. दीपक बापू पाचरणे (वय-30) व खंडू रामभाऊ गाडेकर (वय-47 दोघे रा. शहापूर ता. नगर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

बाराबाभळी गावच्या शिवारात शरद मुथ्था यांच्या पडीक जमिनीमध्ये एक पुरुष जातीचे प्रेत आढळले. याची माहिती बाराबाभळीचे सरपंच माणिक वाघस्कर यांनी बुधवारी सकाळी साडेआठ वाजता भिंगार पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रेताचे निरीक्षण केले असता हा घातपाताचा संशय पाटील यांना आला.

त्यांनी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन निरीक्षक पाटील यांना तपासाबाबत सूचना केल्या. सुरुवातीला मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. परिसरातील लोकांना प्रेत दाखविल्यानंतर रावसाहेब कुंडलिक दारकुंडे यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी दारकुंडे यांची बहीण शेऊबाई संतोष सोमवंशी (वय-40, रा. शहापूर, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत दारकुंडे यांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मान व छाती दाबून दारकुंडे यांचा खून केल्याचे रुग्णालयातील अहवालानुसार स्पष्ट झाले. पोलिसांनी सुरवातीला 10 संशयित ताब्यात घेतले. यातील दीपक पाचरणे याने हा खून मी व माझ्याबरोबर असलेला खंडू गाडेकर यांनी केल्याची कबुली दिली.

दारकुंडे याने आम्हाला सोमवारी दुपारी शिवीगाळ केली होते. त्यामुळे आम्ही त्याचा राग धरून त्याला सायंकाळी साडेपाच वाजता दारू पाजवून लाथाबुक्यांनी मारहाण केली. बाराबाभळी येथील पडीक जमिनीमध्ये एका खोंगळीत दारकुंडे याला ढकलून दिले. मान व छाती दाबून त्याचा आम्ही जीव घेतल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना या गुन्ह्यात गुरुवारी रात्री अटक केली.

या गुन्ह्याचा तपास निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पंकज शिंदे, भैयासाहेब देशमुख, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, दीपक पाठक, पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव, रवींद्र घायतडक, रमेश वराट, अजय नगरे, पोलीस नाईक बाबासाहेब गायकवाड, गोपीनाथ गोर्डे, राजू सुद्रीक, भानुदास खेडेकर, संतोष अडसूळ, राहुल द्वारके, संजय काळे, अरुण मोरे यांनी केला.

Deshdoot
www.deshdoot.com