
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कारमध्ये ठेवलेली पावणेदोन लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. शहरातील झेंडा चौकात रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास हरिश्चंद्र झांबरे (वय 58, रा. रासनेनगर, अहमदनगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. झांबरे यांचा कामरगाव शिवारात पेट्रोलपंप आहे. रविवारी सायंकाळी आठच्या दरम्यान झांंबरे घरी येत असताना झेंडा चौकात रस्त्याच्या कडेला कार लावून जिलेबी घेत होते. यावेळी एका चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झांबरे यांनी त्यांची कार पुढे घेतली असता त्यांना कारमधून खाली उतरण्यास सांगून शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
झांबरे पुन्हा कार बसले असता त्यांना कारमधील पुढील डिक्कीत ठेवलेली एक लाख 72 हजार 800 रूपयांची रोख रक्कम दिसून आली नाही. झांबरे यांच्याबरोबर हुज्जत घालणार्या चारचाकी (एमएच 16 सीक्यू 3200) दोघांच्या इतर साथीदारांनी रोकड चोरल्याचा त्यांना संशय आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक कासार अधिक तपास करत आहेत.