बँकेत भरण्यासाठी दिलेले तीन लाख लांबविले

कापड दुकानदाराला कामगाराचा गंडा
बँकेत भरण्यासाठी दिलेले तीन लाख लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुकानातील व्यवहाराचे तीन लाख 10 हजार रुपये बँकेत भरण्यासाठी कामगाराकडे दिले असता कामगार पैसे घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कापड दुकानदार दिनेश श्यामलाल नारंग (वय 45 रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

ओमकार अशोक उपाधे (रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. नारंग यांचे कापड बाजारात सावन गारमेंटस नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानावर मागील आठ वर्षांपासून उपाधे काम करत होता. तो दुकानातील व्यवहाराचे पैसे नेहमी बँकेत भरणा करीत असल्याने नारंग त्याला नेहमी बँकेत पैसे भरण्यासाठी देत होते. 24 एप्रिल 2023 रोजी नारंग यांनी तीन लाख 10 हजार रुपये मर्चंट बँकेत भरणा करण्यासाठी दिले होते. दरम्यान, उपाधे याने बँकेत पैसे न भरता ते घेऊन पसार झाला.

नारंग यांनी त्याला संपर्क केला असता त्याचा मोबाईल बंद होता. 4 ऑगस्ट रोजी ओमकार उपाधे याचा लहान भाऊ इंद्रजित व मावस भाऊ अभिजित जोशी यांनी नारंग यांना पुणे येथे बोलावून, ओमकारने घेतलेले पैसे आम्ही दर महिन्याला 20 हजार रूपये प्रमाणे देऊ, असे सांगितले होते. दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी ओमकार उपाधे याने नारंग यांना फोन करून भावासोबत पैशासंदर्भात काही बोलला तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली असल्याने नारंग यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com