
अहमदनगर (प्रतिनिधी)
दरोडा, दरोड्याची तयारी, चोरी, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे 22 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय 22 रा. बेलगाव ता. कर्जत) असे त्याचे नाव आहे. त्याने श्रीगोंदा व कर्जत पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या घरफोडीची कबूली दिली आहे.
त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी असा एकुण दोन लाख 29 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कर्जत- मिरजगाव जाणारे रस्त्यावर एक जण गावठी कट्टा कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने विना नंबर दुचाकीवर फिरत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, भिमराज खर्से, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर यांना कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. पथकाने भगवान भोसले याला ताब्यात घेतले. त्याने संदीप ईश्वर भोसले व विशाल उध्दव काळे (दोन्ही रा. बेलगाव, ता. कर्जत) यांच्या मदतीने लक्ष्मीनगर (ता. श्रीगोंदा) व वडगाव तनपुरा (ता. कर्जत) येथे घरफोडी करून दागिने चोरी केले असल्याची कबूली दिली आहे.