
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतातील शेड जेसीबी मशिनच्या सहाय्याने काढणारे उत्कर्ष पाटील यांना पिस्तोलचा धाक दाखवून धमकावण्यात आले. तसेच पाटील यांच्या मांडीवर चिकन कापण्याच्या चॉपरने वार, तसेच लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बाबुर्डी बेंद (ता.नगर) शिवारात बुधवारी (दि. 8) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी मनोज चोभे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बाबुर्डी बेंद, ता.नगर) यांच्यासह 20 ते 25 अनोळखी व्यक्तींवर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्कर्ष सुरेश पाटील (वय 44, धंदा- शेती व बांधकाम, रा. श्रमिक आनंदऋषी मार्ग नगर) हे बाबुर्डी बेंद (ता.नगर) शिवारातील हॉटेल राजवीरसमोरील शेतातील शेड बुधवारी (दि. 8) जेसीबी मशिनच्या सहाय्याने काढत होते.
त्यावेळेस आरोपी मनोज चोभे याने साथीदारांच्या मदतीने दगडफेक केली. त्यानंतर लोखंडी गजाने मारहाण केली. हॉटेलमधील चिकन कापण्याच्या चॉपरने उजव्या मांडीवर, बरगडीवर वार केले. पाटील यांच्याकडे परवानाधारक असलेला पिस्तोल हिसकावून घेतला. पोलिसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे तात्काळ कर्मचार्यांसह घटनास्थळी आले.
नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तपासासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी मनोज चोभे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बाबुर्डी बेंद, ता.नगर) याच्यासह 20 ते 25 अनोळखी व्यक्तींवर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाटील यांचा चोरलेला पिस्तोल हस्तगत करण्यात आला आहे.