नेवासा तहसील अपहार प्रकरणातील आरोपीला अटक

तीन दिवसांची पोलिस कोठडी
नेवासा तहसील अपहार प्रकरणातील आरोपीला अटक

नेवासा l तालुका प्रतिनिधी

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा  वापर करून नैसर्गिक आपत्तीच्या पैसांचा अपहार केल्या प्रकरणातील आरोपीला नेवासा पोलिसांनी मुंबईतून अटक केली असून आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळविल्याप्रकरणी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार विजयलाल सुराणा यांच्या फिर्यादीवरून देडगावचा कोतवाल अविनाश हिवाळे यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी अविनाश हिवाळे यास नेवासा पोलिसांनी मुंबईतून अटक करून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नेवासा येथील तहसील कार्यालयामध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी/ टंचाईच्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे शेताचे पंचनामे करून त्यानुसार यादी सादर करीत असतात. सदर प्राप्त यादीच्या अनुषंगाने संबंधित कामकाज पाहणारे महसूल सहाय्यक व अव्वल कारकुन हे दोघेजण यादीत नमूद केल्यानुसार शेतकरी निहाय-बँक निहाय धनादेश तयार करून सदर धनादेशाचे संबंधित खातेदारांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करणेकामी सदरचे धनादेश बँकेत जमा करण्याकरिता संबंधित गावचे तलाठी व कोतवाल यांचेकडे दिले जातात.

त्यानुसार देडगाव या गावातील लाभार्थी शेतकर्‍यांचे धनादेश महसूल सहाय्यक राजेंद्र दगडु वाघमारे यांनी देडगावचे कोतवाल अविनाश हिवाळे यांना बोलावून सदरचे धनादेश बँकेत जमा करणेबाबतच आदेश दिले होते. त्यावरून संबंधित कोतवाल अविनाश हिवाळे यांनी देडगावसह जेऊर गावाचे धनादेश बँकेत जमा करण्याकामी ताब्यात घेतले होते.

परंतु सदर धनादेश मध्ये खाडाखोड करून व तहसीलदारांच्या बनावट शिक्के-सह्या करून हिवाळे यांनी सदर रकमा ह्या आपल्या स्वतःच्या व आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावर वळवून अपहार केल्याप्रकरणी तहसीलदार सुराणा यांनी दि.26 जून रोजी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

तेव्हापासून आरोपी फरार होता. परंतु नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांना सदर आरोपी हा मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी अविनाश हिवाळे यास मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यास अटक करून नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता नेवासा न्यायालयाने आरोपी अविनाश हीवाळे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com