बागायतदारावर पुन्हा हनीट्रॅप, दोन लाखांची खंडणी

नगरमधील नवीन ट्रॅपवाल्या टोळीविरोधात गुन्हा
बागायतदारावर पुन्हा हनीट्रॅप, दोन लाखांची खंडणी

अहमदनगर|Ahmedagar

नगरमधील एका टोळीने पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविल्याची घटना उघडकीस आली आहे. (ahmednagar honeytrap case)

वडगाव गुप्ता (Vadgoan Gupta) परिसरात राहणार्‍या तरूणीने त्या बागायतदाराशी मैत्री करून त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली. या बागायतदाराने त्या ट्रॅपवाल्या टोळीला चेकने पैसे दिले व नंतर एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात फिर्याद दिल्याने नगरमधील हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे. पोलिसांनी त्या ट्रॅपवाल्या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 15 व 16 जून रोजी ही घटना घडली आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा पती व त्यांचा पाथर्डी तालुक्यातील एका पंटरचा समावेश आहे. ते सध्या पसार झाले असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तरूणीने त्या बागायतदाराला फोन करून त्याच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून तीने त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. 15 जून रोजी सायंकाळी बागायतदाराला घरी बोलून घेतले. ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा पती आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटरला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी त्याची फिर्याद दाखल करून घेतली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करत आहे.

दरम्यान नगर तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हनीट्रॅपची एक टोळी उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात हनीट्रॅपच्या घटना घडल्या. आणि आता पुन्हा नगरमध्ये हनीट्रॅपची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीला अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com