रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या संचालकासह जिल्हा उपनिबंधकावर गुन्हा
सार्वमत

रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या संचालकासह जिल्हा उपनिबंधकावर गुन्हा

ठेवीदारांचे पैसे न दिल्याने न्यायालयाचा दणका

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यामुळे रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व नाव बदलानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठेविदार इस्माईल गुलाब शेख (वय- 71 रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, नगर शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत लघु, मध्यम व दीर्घ मुदतीत पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास व्याजासह चांगला परताव मिळेल असे प्रलोभन दाखविण्यात आले होते. यामुळे फिर्यादी यांनी या पतसंस्थेत 54 हजार 657 रूपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवली होती. मात्र मुदत संपूनदेखील फिर्यादी यांना ही रक्कम व्याजासह देण्यात पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने टाळाटाळ केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. परंतू, संबंधितांविरूद्ध कुठलीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, तालुका उपनिबंधक यांनी केले. यामुळे शेख यांनी जिल्हा न्यायालयात रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. यावर न्यायालयाने फिर्यादीच्या मागणीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधीत पोलीस ठाणे यांना दिले. यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये रावसाहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख, अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, संचालक शेख नसीर अब्दुला, संतोषकुमार संभाजीराव कदम, लक्ष्मण सखाराम जाधव, भास्कर सिताराम पवार, शरद शंकरराव धोंडे, शकुंतला भाऊसाहेब चौधरी, आशा हरीष भिंगारदिवे, प्रकाश नथ्थू सोनवणे, संजय गंगाधर मंचरे, संजवनी संभाजीराव पानसंबळ. तसेच, प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कुंकूलोळ राजेंद्र झुंबरलाल, संचालक राजेश शिवलाल भनसाठी, दिपक शिवराम पटारे, रामसुख दामोधर मंत्री, प्रकाश शिवमुर्ती हापसे, संदीप अच्चुतराव चव्हाण, आप्पासाहेब दशरथा सालापुरे, उषा दिगंबर केदारी, शितल चेतन भुताडा, रूपाली निखिल वारे, मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर, भाऊसाहेब नानाभाऊ सरोदे, जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी जिल्हा सहकारी संस्था, नगर तालुका उपनिबंधक यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com