कोपरगावमध्ये पाच कोटींच्या निधीवरून श्रेयवाद

कोपरगावमध्ये पाच कोटींच्या निधीवरून श्रेयवाद

आमदार काळे यांनी पाच कोटींबाबत दिशाभूल करू नये- उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहर विकासाची कामे झालीच पाहिजे, अशी आमची कायमच भूमिका राहिलेली आहे. तेव्हा काळे गटाच्या नगरसेवकांनी शहर विकासाच्या नावाखाली दिशाभूल करू नये. वैशिष्ट्यपूर्ण पाच कोटी रुपयांच्या निधीबाबत आमदार आशुतोष काळे यांचा सुतराम संबंध नाही. राज्यातील प्रत्येक नगरपालिकांना शासन अशा प्रकारचा निधी वितरित करीत असते. तेव्हा काळे गटाच्या नगरसेवकांनी उगाचच शहर विकासाचा पुळका दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, अशी टीका उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी केली आहे.

कुरेशी यांनी म्हटले आहे, गेल्या दोन वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिलेला नाही. उलट माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे कार्यकाळात कोपरगाव नगरपालिका इमारत, पाणीपुरवठा योजना, नाट्यगृह, बस स्थानक, पोलीस स्टेशन, बाजारओटे, अग्निशमन इमारत, इत्यादी प्रकारच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ही कामे मार्गी लावलेले आहेत. आमदार आशुतोष काळे व त्यांच्या नगरसेवकांनी यापूर्वीही १४ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत त्यांचा सुतराम संबंध नसताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. त्याची पोलखोल आम्ही यापूर्वीच केलेली आहे. नगरपालिका ताब्यात असो नसो अगर आमदार सत्ताधारी किंवा विरोधी असले तरी राज्यातील महाराष्ट्र शासन हे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून पाच ते दहा कोटी रुपयांचा निधी वितरीत करीत असते. त्यातून शहर विकासाची कामे होत असतात. तेव्हा आमदार आशुतोष काळे व त्यांच्या समर्थकांनी स्वतःची खोटी प्रसिद्धी, लोकप्रियता वाढवण्यासाठी जनतेची दिशाभूल होईल, अशी कुठलेही निवेदने देऊ नये, असे उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी म्हणाले.

निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही- नवाज कुरेशी

विकासकामांसाठी मिळविण्यासाठी निधी पाठपुरावा करावा लागतो. लोकप्रतिनिधी कुणीही असो निधीसाठी पाठपुरावा करावाच लागतो व पाठपुरावा केल्यानंतरच मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मिळतो. हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही, अशी टीका कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांच्यावर केली आहे. पत्रकात म्हटले आहे, मागील पाच वर्षांत आपल्या नेत्याने काय दिवे लावले हे आपल्या नेत्यांना विचारा. आपल्या करणीमुळे शहरातील नागरिकांनी आपल्या नेत्याला घरी बसविले आहे. त्यांनी नेहमीच निधी मिळविण्याचा कांगावा केला आहे. तो निधी त्यांनी त्यांच्या घरातून दिला होता का हे त्यांना विचारून निधी मिळविण्यासाठी काय प्रक्रिया असतात ह्या त्यांच्याकडून शिकून घ्या. दुसऱ्यावर आरोप करून नागरिकांचे मनोरंजन करण्यापेक्षा शहर विकासासाठी आपली नकारात्मक भूमिका बाजूला ठेवा.

आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून करोनाच्या जीवघेण्या संकटात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दीडच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेला १२ कोटी निधी आणला आहे. पुढील काळात शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे हे शहरातील नागरिक जाणून आहेत. मागील पाच वर्षांत ज्यांची राज्यात व केंद्रात एकहाती सत्ता असताना त्यांना जे जमले नाही ते आ. आशुतोष काळे यांनी करून दाखविले आहे. हे मागील पाच वर्षात का शक्य झाले नाही हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना विचारले पाहिजे.

कोपरगाव शहरात ज्या प्रभागात विकासकामे केली जातात तो निधी देखील शासनाचाच असतो. मात्र प्रभागातील विकासकामांना निधी मिळावा यासाठी त्या-त्या प्रभागातील नगरसेवकालाच पाठपुरावा करावा लागतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांच्या बुद्धीच्या पलीकडचे असून त्यांच्या बुद्धीची किव कराविशी वाटते. असे उपनगराध्यक्ष कोपरगाव शहराला भेटले हे कोपरगाव शहराचे दुर्दैव आहे. ज्यांना स्वतःचे नाव कागदावर लिहिता येत नाही त्यांना निधी कसा मिळवावा लागतो याच्या प्रक्रिया काय माहित असणार. त्यामुळे असे बालिश वक्तव्य त्यांच्याकडून होणे साहजिकच आहे. त्यामुळे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांनी आपले नाव लिहायचे शिकावे आणि मग दुसऱ्यावर टीका करावी असा सल्ला नवाज कुरेशी यांनी दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com