पतसंस्था चळवळ अधिक निरोगी व सुदृढ व्हावी - आ. थोरात

पतसंस्था चळवळ अधिक निरोगी व सुदृढ व्हावी - आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

1985 नंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पतसंस्थांची स्थापना झाली. या सर्व पतसंस्थांनी ग्रामीण भागातील गोरगरीब माणसाला आर्थिक अडचणीत मदत केली आहे. या पतसंस्थांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून भविष्यात पतसंस्था चळवळ अधिक निरोगी व सुदृढ व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वतीने तालुक्यातील शहरी व ग्रामीण पतसंस्थांचा मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नागरी बँकांचे अध्यक्ष गिरीश घैसास, बाजीराव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, शंकर पा. खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, गणपतराव सांगळे, आर. बी. राहणे, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, सुहास आहेर, अजय फटांगरे, बँकेचे व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे. मिलिंद कानवडे, कैलास सोमाणी, सुरेश थोरात, राणी प्रसाद मुंदडा आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे मोठे जाळे असून यामध्ये साधारण सुमारे 2000 कोटींच्या ठेवी आहेत. हे पैसे गोरगरिब व सर्वसामान्यांचे आहेत. त्यांचा विश्वास जपताना पतसंस्थांनी अधिक निरोगी व सुदृढतेने काम करावे यासाठी नवनवीन नियमांचा अभ्यास करावा. संगमनेर तालुक्यातील दूध संस्था आणि पतसंस्था एकत्रित असल्याचा हा पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार चळवळ ही गोरगरिबांच्या विकासासाठी आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे राज्यातील सहकाराला तोटा होत आहे. सरकारला सहकारावर नियंत्रण हवे आहे. मात्र सरकार मदत करत नाही. याविरुद्ध सर्व पतसंस्थांनी संघटनेतून लढा दिला पाहिजे.

काकासाहेब कोयटे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार मॉडेल देशासाठी दिशादर्शक आहे. राज्यात पतसंस्था हे मोठे जाळे असून आयकर विभागाची माफी असतानाही आयकर आकारणीसाठी तगादा लावला जात आहे. याबाबत वेळीच निर्णय झाला नाही तर रिझर्व्ह बँकेवर सर्व पतसंस्थांचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी बँकेचे संचालक किसनराव सुपेकर, लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, श्रीकांत गिरी, किसनराव वाळके, बाबुराव गुंजाळ, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, सौ. सुनीताताई अभंग, राजू गुंजाळ, भाऊसाहेब गीते, गोरख कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, मॅनेजर रमेश थोरात आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

वेबसाईट व क्यूआर कोडचा प्रारंभ

अमृतवाहिनी बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून आजच्या आधुनिक सर्व यंत्रणा राबविल्या आहेत. याचबरोबर आता नव्याने बँकेची वेबसाईट सुरू करण्यात आली असून ग्राहकांना क्यू आर कोड देण्यात आला आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा शुभारंभ आणि शहरी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट काम करण्यार्‍या सहा पतसंस्थांचा सत्कार ही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com