
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
प्रेमात अंधळ्या झालेल्या खासगी पतसंस्थेतील महिला कर्मचार्याने बँकेतील सुमारे38 लाख 34 हजार रूपये आणि बारा तोळे सोने घेऊन आपल्या प्रियकरा बरोबर पोबारा केल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सबंधीत पतसंस्था अगर इतरांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. मात्र मुलीच्या आईने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये युवकाचे नाव घेण्यात आले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी शहरातील एका खाजगी पतसंस्थेमध्ये वीस वर्षीच्या मुलीने बँकेतील रोख रक्कम 38 लाख 34 हजार रूपये आणि बारा तोळे सोन्याचे दागिने घेऊन आपल्या प्रियकरासोबत पसार झाली आहे.
बँकेत असलेला खातेदारांचा पैसा आणि सोने तारण ठेवून ग्राहकांनी त्यावर पैसे घेतले आहे. त्या पैशावर आणि सोन्याच्या दागिन्यांवर बँकेत काम करणार्या महिला कर्मचार्यांनी प्रेमात आंधळे होत डल्ला मारला आहे. वास्तविक पाहता या घटनेत नोकरी करणार्या महिलेने चोरी केली असल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे चोरीचा गुन्हा बँकेच्या जबाबदार व्यक्तीने दाखल करणे अपेक्षित आहे.
मात्र तसे न होता मुलीच्या आईने आपली मुलगी बेपत्ता झाली असून तिच्याकडे साडे 38 लाख रुपये व बारा तोळ्याचे दागिने घेऊन गेल्याची तक्रार पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे पतसंस्थेच्या सभासदांमध्ये उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे.