संगमनेरातील नामांकित पतसंस्थेत 25 कोटींचा अपहार?

पतसंस्थेला टाळे लागले, चार कर्मचार्‍यांच्या विरोधात तक्रार
संगमनेरातील नामांकित पतसंस्थेत 25 कोटींचा अपहार?

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहरातील अत्यंत नावाजलेल्या एका बड्या पतसंस्थेला बुधवारी अचानक टाळे लावण्यात आल्याने या पतसंस्थेचे कर्जदार, ठेवीदार व सभासदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या पतसंस्थेमध्ये तब्बल 25 कोटी हून अधिक रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. गेल्या दोन दिवसापासून कर्मचार्‍यांनी देखील पतसंस्थेत पाऊल ठेवले नाही तर संस्थेच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह अन्य चार कर्मचार्‍यांविरोधात संबंधित खात्याकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.

संगमनेर तालुक्यातील एका विद्यमान राजकीय पदाधिकार्‍याने तीस वर्षांपूर्वी या पतसंस्थेची स्थापना केली होती. अत्यंत कमी कालावधीमध्ये ही पतसंस्था नावारुपास आली होती. दोन हजाराहून अधिक सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेचा विस्तार तालुक्यातील विविध गावात करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शाखा विस्तार करून या संस्थेने मोठे यश मिळवले आहे. जवळपास चार कोटी भाग भांडवल असलेल्या या संस्थेकडे सव्वाशे कोटींच्या ठेवी आहेत. या संस्थेने तब्बल 100 कोटींच्या कर्जाचे वाटपही केलेले आहे. शहरात स्वतःच्या मालकीच्या जागेत या संस्थेने भव्य इमारतही उभारली आहे.

अतिशय नावाजलेली ही पतसंस्था गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेली आहे. या पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची दबकी चर्चा संस्थेच्या सभासदांमधून होत होती. संस्थेच्या अध्यक्षासह व्यवस्थापकानेही आपली काही मालमत्ता विकून भरपाई करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच बुधवारी सकाळी अचानक या पतसंस्थेचे टाळे उघडण्यात आले नाही. कोणतीही सुट्टी नसताना दिवसभर या पतसंस्थेचे कार्यालय उघडण्यात आले नाही.

याबाबत सभासदांना माहिती मिळताच भल्या सकाळी अनेक ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर गर्दी केली. मात्र पतसंस्थेचे मुख्य प्रवेश द्वार व आतील मुख्य दरवाजाही बंद असल्याने या सभासदांना रिकाम्या हाती परत जावे लागले. त्यांनी संस्थेच्या कर्मचार्‍यांना व पदाधिकार्‍यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र पतसंस्था बंद ठेवण्याचे कारण या सभासदांना सांगण्यात आले नाही. यामुळे अनेक ठेवीदारांनी पोलीस अधिकारी व उपनिबंधक कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी त्यांना योग्य कारण समजले नाही. कोणत्याही पतसंस्थेला कारणाशिवाय सुट्टी देता येत नाही, असे असतानाही ही पतसंस्था मात्र दिवसभर बंद होती.

दरम्यान उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर पतसंस्था बंदची आम्हाला कुठलीही कल्पना नाही. सभासद, संचालक, पतसंस्थेचे कर्मचारी यांची कुठलीही तक्रार नाही. त्यामुळे, कारवाईचा कुठला प्रश्न उपस्थित होत नाही. वरिष्ठांचे त्यासंदर्भात फोन आले पण, तक्रार देण्यासाठी अद्याप कोणी पुढे आले नाही, असे त्यांनी सांगितले.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता पतसंस्थेबाबत कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले.

गैरव्यवहाराचे खापर कर्मचार्‍यांवर?

या पतसंस्थेत वीस वर्षांपूर्वी आर्थिक अपहाराचा प्रकार घडला होता. यावर्षी पुन्हा एकदा कोट्यवधींचा अपहार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान पतसंस्थेच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी संबंधित खात्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. पतसंस्थेचे व्यवस्थापक व इतर चार कर्मचार्‍यांविरोधात तक्रार केली आहे. सुमारे 25 कोटी रुपयांचा अपहर केल्याचे अध्यक्षांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे. यानंतर अर्ज उपनिबंधक कार्यालयात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पतसंस्थेच्या व्यवस्थापकांनी मोठी रक्कम शहरातील वेगवेगळ्या तीन बँकांमधून आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com