गणेश मूर्तींवर कारागीर फिरवताहेत शेवटचा हात

करोना संकट; शासनाच्या नियमानुसार यंदा बनवल्या आहेत जास्तीत जास्त 4 फुटांपर्यंतच्या मूर्ती
गणेश मूर्तींवर कारागीर फिरवताहेत शेवटचा हात

नेवासा बुद्रुक | मोहन गायकवाड| Newasa Budruk

एकीकडे राज्यात करोना महामारीचा हाहाकार सुरू आहे तर दुसरीकडे आतुरतेने वाट पाहत असणार्‍या श्री गणेशाचे आगमन यंदा 9 सप्टेंबर ला होत आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असले तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम कारखान्यात जवळपास वर्षभर चालतं. सहा इंचांपासून ते काही 4 फुटांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती कारखान्यात बनवल्या जातात. नेवासा तालुक्यातले जवळपास 8 ते 10 हजार जण या व्यवसायात आहेत.

नेवासा तालुक्यातील साईनाथ नगर येथील कारखाना मालक सोमनाथ अर्जुन भागवत व गोरक्षनाथ अर्जुन हे दोघे भाऊ, वडील, पत्नी व मुलांसमवेत नवनवीन गणेश मूर्ती बनवत आहेत. यावर्षी करोना काळात डॉक्टर, पोलीस, यांची भूमिका करोना महामारीत महत्वाची ठरली म्हणून यांची एक मुखी असलेल्या मुर्त्या कारागीर मोठया प्रमाणावर बनवत आहेत.

मोठमोठ्या सार्वजनिक मंडळासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार 1 फुटा पासून तर 4 फुटापर्यत श्रीं च्या आकर्षक मूतीर्र् बनवण्याचें काम सुरू आहे. आता सर्व मूर्तींवर शेवटचा हात हे कारागीर फिरवत आहेत. भागवत यांच्या मूर्ती अहमदनगर, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, अकोला, जालना, सुपा व तालुक्यांत सर्व ठिकाणी जात आहेत.

यावर्षी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर श्री गणेशाच्या मूर्ती तयार होत आहेत. यंदा सर्वत्र शाडूच्या मूर्ती तयार करण्यावर कारागीर भर देत आहेत. लहान मूर्ती शाडूपासून बनवल्या जात आहेत तर मोठ्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवल्या जात आहेत.

पण करोनामुळे या व्यवसायाला यंदा खीळ बसली. त्यात अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पाहता, यंदा 15% कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झालेली आहे. गणेशोत्सवावरच परिणाम होईल असे चित्र आहे. यातून कसं सावरायचं असा प्रश्न भागवत यांच्यासारखे व्यावसायिक विचारत आहेत.

एक गणपतीची मूर्ती तयार व्हायला संपूर्ण कुटुंबातील सदस्यां चा हातभार लागतो. यात मूळ शिल्प घडवणारे, त्याचे साचे पाडणारे, मूर्ती करणारे, रंगकाम करणारे, डोळ्यांची आखणी करणारे अशा कारागिरांसोबतच मूर्तींना पॉलिश करणं, साधा रंग लावणं अशा लोकांचा समावेश आहे हे सर्व काम एकदम साध्या पद्धतीने सर्व भागवत कुटुंबातील सदस्य करत आहेत. भागवत कुटुंबाचा हा पिढीजात व्यवसाय आहे

बहुतेक कारखानदार कर्ज काढून तो पैसा दरवर्षी व्यवसायात ओततात. यंदा देखील अशा संकटांत मूर्ती विक्री झाली नाही तर कारखान दारांची पूर्ण गळचेपी होईल हे नक्की मात्र तरीही आज शेवटचा हात हे कारागीर श्रींच्या मूर्तीवर फिरवताना दिसत आहे.

मागील वर्षी मोठे आर्थिक नुकसान झाले. 50% कारखाना तोट्यात चालावा लागला कारागिरांना देखील संभाळणे मुश्कील झाले. त्यामुळे सर्व कुटुंब मूर्ती बनवत आहे. यंदा कच्च्या मालाच्या दरात 15% वाढ झाली त्यामुळे मूर्तीचे दरही वाढलेले असतील.

- सोमनाथ भागवत (मूर्ती कारागीर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com