फटाका व्यवसायाला महागाईचा फटका

फटाक्या मालाची 40% पेक्षा जास्त दरवाढ
फटाका व्यवसायाला महागाईचा फटका

अहमदनगर | प्रतिनिधी

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निर्बंधमुक्त दीपावली साजरी होत असताना यावर्षी फटका विक्री व्यवसायाला विक्रमी दरवाढीचे ग्रहण लागले आहे. दोन वर्षात घटलेले उत्पादन, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली कमालीची वाढ आणि पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे यंदा फटाका व्यावसायिकांना देखील या महागाईचा फटका बसला आहे अशी माहिती दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.

भरमसाठ फटाक्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पिढ्यान पिढ्या फटाका विक्रीचा व्यवसाय घाऊक स्वरूपात करणारे दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे व्यापारी हवालदिल झाले आहेत. आहे त्या किमतीच्या ३५ ते ४० टक्के वाढीव दराने व्यापाऱ्यांना माल खरेदी करावा लागला आहे. याचा परीणाम किरकोळ फटका विक्री व्यवसायावर झाला आहे.

नगर कल्याण रोडवर दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन ने फटाका मार्केट थाटले आहे. दरवर्षी घटस्थापने पासूनच हे मार्केट सुरु होते. यावर्षी विजयादशमीच्या आसपास हे मार्केट सुरु झाले. लवकरच यामार्केटचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या अगोदर हे मार्केट अनौपचारिक पणे सुरु करण्यात आले आहे.

श्रीनिवास बोज्जा म्हणाले कि, आपण ३० वर्षांपासून हा व्यवसाय करतो. दरवर्षी न चुकता तामिळनाडू राज्यातील शिवकाशी येथे जाऊन फटाके घाऊक स्वरूपात खरेदी करतो. नगरच्या ग्राहकांना माफक दरात फटाके आमची असोसिएशन उपलब्ध करून देते. त्यासाठी आमचे व्यापारी सहा महिने वर्ष भर अगोदर माल बुक करून खरेदी करतात. पण इतके सगळे करूनही यावर्षी फटाक्यांच्या दरात विक्रमी ३५ ते ४० टक्के वाढ झाली असल्याने आम्ही हतबल झालो आहोत. प्रत्येक जण नफा कमावण्यासाठी व्यवसाय करतो. परंतु यावर्षी कमीत कमी नफा कमवून व्यापाऱ्यांना माल विकावा लागणार आहे.

कारण पेट्रोल डिझेल चे वाढते दर, कच्च्या मालाची टंचाई, दारुगोळा आणि रसायनांच्या किमती वाढल्याने शिवकाशी येथून मागविलेले फटाके वाढीव दराने नगरच्या मार्केट मध्ये आले आहेत. आता त्यावर किरकोळ नफा ठेऊन यावर्षी आम्हाला फटाके विकावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आणि किरकोळ विक्रेत्यांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन बोज्जा यांनी केले आहे.

नगर कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपाजवळ थाटण्यात आलेले नगरचे फटाका मार्केट संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. नगरहून पुणे, शिरूर, जुन्नर, मंचर, नारायणगाव, शिक्रापूर, बीड, केज, परळी, भूम, परांडा, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, मनमाड, गंगापूर तसेच नगर जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी फटाका खरेदीसाठी याच मार्केटवर अवलंबून असतात. याठिकाणी ३१ स्टॉल उभारण्यात आले आहेत. याठिकाणी मनपाने अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून असोसिएशन ने चारही बाजूने पत्रे ठोकून हा परिसर बंदिस्त केला आहे. तसेच सुरक्षा रक्षक येथे तैनात केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com