गोठे न बांधताच लाटले अनुदान

माहेगाव देशमुखमध्ये गायगोठा प्रकरणात गैरप्रकार
 गोठे न बांधताच लाटले अनुदान

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नरेगा आंतर्गत गायींचे गोठा अनुदान योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून पंचायत समिती पदाधिकार्‍याने जवळच्या लोकांना या योजनेचा लाभ दिला असून गायगोठा न बांधताच अनुदान लाटले असल्याची तक्रार प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप काळे यांनी केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी तहसीलदारांकडेे केली असून कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, सन 2019-20 मध्ये नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत माहेगाव देशमुख ग्रामसेवक व सरपंच आणि इतर सदस्यांनी गावातील नागरिकांचे गायगोठ्याचे प्रस्ताव पाठविले होते. सदर प्रस्ताव गटविकास अधिकारी कोपरगाव यांनी मंजूरही केले. सदर प्रस्तावात आदिवासी, दलीत, अल्पभूधारकांचे नावाचा विचार न करता पंचायत समिती पदाधिकार्‍या.च्या जवळच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. प्रस्ताव मंजूर तर झाले मात्र प्रत्यक्षात गोठे बांधले नाही. खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे पंचनामे दिल्यावरून अधिकार्‍यांनी संबंधितांच्या खात्यावर रकमाही जमा केल्या.

माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी पदाचा दुरुपयोग केला. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती न देता उडवाउडवीचे उत्तर दिले. नवनाथ वाघ व इतर शेतकर्‍यांना अरेतुरेची भाषा वापरली. या प्रकरणात अधिकार्‍यांची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. माहेगाव देशमुख गावातील नाही तर संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील लाभार्थ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. दि. 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 01 नोव्हेंबर 2021 रोजी तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संदीप काळे, आकाश काळे, नवनाथ वाघ, दौलत गडाख आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.