अबब... गायीची विक्री तब्बल 2 लाख 11 हजाराला

अबब... गायीची विक्री तब्बल 2 लाख 11 हजाराला

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील प्रशांत, अमोल व राजेंद्र रंगनाथ नागले यांच्या मुक्त गोठ्यातील गायीची तब्बल 2 लाख 11 हजार 1 रुपयाला गोठ्यातच विक्री झाली. विक्रमी किंमतीला गाय विकली गेल्याने आजपर्यंतच्या विक्री झालेल्या गायींच्या किमतीत ही उच्चांकी किंमत असल्याचे बोलले जात आहे.

येथील प्रशांत रंगनाथ नागले या तरुण शेतकर्‍याने शेती पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला होता. मात्र आता नागले बंधुंचा हा मुख्य व्यवसाय झाला आहे. गोपालन व्यवसायात सातत्याने वाढ करुन त्याचे मुख्य व्यवसायात रुपांतर केल्याने त्यांच्या गोठ्यात दर्जेदार 50 पेक्षा अधिक संकरीत गायी झाल्या आहेत. शेतातच सुमारे दिड एकर जागेत त्यांनी मुक्त गोठा केला आहे. यामध्ये दर्जेदार वाणाच्या गायींचे संगोपन केले जात असून दररोज सुमारे 450 ते 500 लिटर निर्भेळ दूध वितरीत केले जात आहे.

त्यांच्या गोठ्यातील गुड्डी या संकरीत गायीची गोठ्यातच विक्री झाली असून ती 2 लाख 11 हजार 1 रुपयाला सोनगाव (राहाता) येथील व्यापारी यांनी गोठ्यातून खरेदी केली. आतापर्यंतच्या खरेदी विक्रीतील ही उच्चांकी किंमत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या जातीची ही गाय दररोज सुमारे 40 लिटर दूध देत असून ती दुसर्‍या वेताची आहे. त्यासोबतच नागले बंधुंच्या गोठ्यातील राणी या 35 लिटर दुध देणार्‍या गायीची 1 लाख 41 हजाराला तर लक्ष्मी या 30 लिटर दूध देणार्‍या गायीची 1 लाख 21 हजाराला विक्री झाली. विक्रीनंतर या गायींची बसस्थानक परीसरात भर पावसात गुलालाची उधळण करीत व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून नागले बंधूंनी त्यांची पाठवणी केली.

यावेळी नुरमंहमद शेख, मुन्ना पाथरेवाले, इम्तियाज शेख, संतोष घोगरे, उस्मार्न पठाण, संभाजी ब्राम्हणे, रमेश नागले, बाळासाहेब कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, समशेर कुरेशी, सोहेल शेख, सोमनाथ शिंदे, दत्ताञय मगर, गणेश कोकणे, खुशाल नागले, बंडू नागले, प्रशांत नागले, राजेंद्र नागले, प्रकाश रणनवरे, सचिन नागले, विलास सपकळ आदींसह परीसरातील गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com