जिल्ह्यातील 'या' तालुक्यात पूर्ण लॉकडाऊनचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

जिल्ह्यातील 'या' तालुक्यात पूर्ण लॉकडाऊनचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
लॉकडाऊन

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करोना नियंत्रणासाठी प्रशासन पूर्णपणे काळजी घेत आहे. सर्व उपाययोजना करूनही करोना नियंत्रणात न आल्यास संगमनेरमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला असल्याने या पार्श्वभूमीवर त्यांनी संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात काल दुपारी आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सभापती सुनंदा वाकचौरे, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर डॉ. सोनाली बांगर, डॉ.भागवत दहीफळे डॉ. राजकुमार जन्हऱ्हाड, डॉ. संदीप कचेरिया आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर हे करोना बाधित रुग्ण संख्येत अग्रेसर आहेत. संगमनेरची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. कंटेन्मेंट झोन करूनही यश का मिळत नाही हा आता परीक्षणाचा विषय बनला आहे. प्रशासकीय पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाएक प्रशिक्षणवर्ग घेणार आहोत. परिसर शहर आणि तालुक्यातील टेस्टिंग वाढवावी, संगमनेरची परिस्थिती चिंताजनक असून लोकसंख्येच्या तुलनेत २५ टक्के नागरिक याठिकाणी बाधित झालेले आहेत. चाचणीत दहा रुग्ण आढळल्यास तो एरिया कंटेन्मेंट झोन करण्यात यावा अशा परिसराचे शंभर टक्के व्हॅक्सिनेशनला प्राधान्य देण्यात यावे.

पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच पदाधिकारी याबाबत प्रतिसाद देणार नसेल तर त्यांना नोटीस पाठवणार आहोत. शिस्तभंग केल्यास तलाठी, ग्रामसेवक, सरपंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.

राज्य शासनाने शाळा व मंदिराबाबत घेतलेला निर्णय हा राज्यासाठी लागू असला तरी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर त्या-त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातील व त्याचे आदेशही कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. संगमनेर शहराची करोना बाधितांमध्ये अशीच लक्षणीय वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन शिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे भोसले यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी येताच दुर्गंधी गायब

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेणार असल्याचे वृत्त समजतात पंचायत समितीचे प्रशासन कामाला लागले होते. पंचायत समितीच्या सभागृहातील स्वच्छता गृहांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी सुटली होती. इतर ठिकाणीही वास येत होता. जिल्हाधिकारी पोहोचण्याच्या अगोदर घाईघाईने याठिकाणी रूम फ्रेशनर मारण्यात आले. यामुळे दुर्गंधी गायब झाली केवळ जिल्हाधिकाऱ्यांसाठी नव्हे तर सर्वांसाठी पंचायत समिती सभागृहात व परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्यात यावी अशी चर्चा काहीजण करत होते.

Related Stories

No stories found.