
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
चीनमध्ये वाढलेल्या करोनाच्या चर्चेने भारतातही खबरदारीच्या सूचना दिल्या असून त्याअनुषंगाने गेल्या काही महिन्यांपासून थांबलेले लसीकरणही पुन्हा सुरू झाले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यासह अनावश्यक गर्दी टाळण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात करोना लसीचा एकही डोस न घेतलेल्यांची संख्याही पाच लाखांच्या पुढे आहे.
चीनमध्ये करोनाच्या नव्या लाटेमुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर भारत सावध झाला आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनुसार भारतात यावेळी करोना संसर्ग लोकांसाठी फारसा गंभीर नाही. अशा परिस्थितीत लाट आली तरी रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी राहील. गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले करोना प्रतिबंधक लसीकरण पुन्हा सुरू झाले आहे. शासकीय रूग्णालयासह, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे पूर्वीप्रमाणे लस उपलब्ध आहे.
आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आहे. शासकीय, तसेच खासगी दवाखान्यातील करोना संदर्भातील यंत्रणा सज्ज आहे की नाही याचा आढावा घेतला जात आहे. ग्रामीण स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. औषधी, लस, ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत आढावा घेतला जात आहे.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
जिल्ह्यात आतापर्यंत 34 लाख 20 हजार 292 म्हणजे 85.6 टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. 15 टक्के लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. तर 68 टक्के म्हणजे 27 लाख 14 हजार 656 जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप 32 टक्के जनतेचा दुसरा डोस बाकी आहे. तर बूस्टर लसीकरण 6 टक्के झाले आहे. केवळ 2 लाख 44 हजार 334 लोकांनी आतापर्यंत बुस्टर डोस घेतला आहे.