दोन कोव्हिड रुग्णालयांनी बिलाची माहिती दडवली

कारवाई : नोटीस दिल्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ
दोन कोव्हिड रुग्णालयांनी बिलाची माहिती दडवली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाग्रस्तांवर उपचार केलेल्या बिलांची मािंहती देण्यास टाळाटाळ करणार्‍या दोन खासगी कोव्हिड सेंटरवर कारवाई करण्याच्या हालाचाली जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सुरू आहेत.

सावेडीतील पटियाला हाऊसमधील अहमदनगर कोव्हिड सेंटर आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल अशी त्या दोघा खासगींची नावे आहेत. उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. जिल्हा प्रशासन या कोव्हिड रुग्णालयावर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

खासगी हॉस्पिटल करोनाग्रस्तांची लूट करून बिले आकारत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हॉस्पिटलमधील लाखापुढील बिले तपासणीसाठी सहा भरारी पथकाची स्थापना केली.

या भरारी पथकात महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

समितीने शहरातील 28 खासगी हॉस्पिटलकडून करोनाग्रस्तांवरील केलेल्या उपचाराची माहिती मागविली. 28 पैकी सहा हॉस्पिटलमध्ये एकाही करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आलेले नाहीत. तर चार हॉस्पिटलमध्ये एक लाखापुढील एकही बिल नाही.

सावेडीतील पटियाला हाऊसमधील अहमदनगर कोवीड सेंटर आणि विघ्नहर्ता हॉस्पिटलला नोटीस देऊनही त्यांनी कोणतीच माहिती समितीला दिलेली नाही. किती रुग्ण अ‍ॅडमीट आहेत, किती बाधितांवर उपचार केले, किती डिस्चार्ज झाले याबाबतची कोणतीच माहिती या दोन्ही कोव्हिड सेंटरने दिलेली नाही.

नोटीस देऊन आठ दिवस झाले असूनही माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही सेंटरची मान्यता रद्द करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनात सुरू आहेत. समितीच्या अध्यक्षा निर्मळ यांनी ही बाब जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार आता जिल्हा प्रशासन या कोव्हिड हॉस्पिटलवर कारवाईच्या तयारीत आहेत. या माहितीला निर्मळ यांनी दुजोरा दिला आहे.

76 बिलांतील 12 लाख 85 हजार वसूलपात्र

समितीकडे एक लाखापेक्षा अधिक रकमेची 201 बिले आली आहेत. या बिलांपैंकी 157 बिलांची समितीने तपासणी केली. त्यामधील 76 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्रुटीमधील या बिलांमध्ये 12 लाख 85 हजार रुपये वसुलीस पात्र असल्याचा अभिप्राय समितीने नोंदविला आहे. समितीने संबंधित हॉस्पिटलला नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. दरम्यान 28 खासगी हॉस्पिटलला कोव्हिड उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात बर्‍या हॉस्पिटलने कोव्हिड उपचार सुरू केलेले नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत, तेथे आतापर्यंत 2 हजार 375 रुग्ण दाखल करण्यात आले असून यातील 1 हजार 793 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com