अजितदादा पवार पॉलिटेक्निकमधील कोव्हिड सेंटर हलविले
सार्वमत

अजितदादा पवार पॉलिटेक्निकमधील कोव्हिड सेंटर हलविले

संस्था प्रमुखांची नाराजी; वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणाबाबत तहसीलदारांकडे तक्रार

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

करोना पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आहे हे न सांगता कोव्हिड सेंटरमध्ये ठेवून आम्हाला अंधारात ठेवण्यात आले. तसेच कोव्हिड सेंटर मधील वैद्यकीय सर्व सामान घेऊन हे सेंटर बंद करतानाही कोणतीही कल्पना दिली नाही. कोव्हिड सेंटर चालू असताना वैद्यकीय अधिकार्‍यांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. या निष्काळजीपणाबाबतची तक्रार अजितदादा पवार पॉलिटेक्निकलचे प्रमुख बाळासाहेब पवार यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली आहे.

कोव्हिड सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदारांचा आदेश येताच आम्ही याठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू केले. वीज वितरणचे अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना आमच्या येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. परंतु ते पॉझिटिव्ह आहे हे वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोणालाही सांगितले नाही. त्याठिकाणी आमच्या संस्थेचे कर्मचारीही मदत म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे कपडे, बेड, व अन्य साहित्य तसेच पडून होते ते सर्व आमच्या कर्मचार्‍यांनी आवरलेही. त्यानंतर कळाले की, ते अधिकारी पॉझिटिव्ह होते. त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला.

शहरातील काही प्रतिष्ठीत लोकांंनाही याठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले तेही निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे सांगितले नाही. तसेच येथील कोव्हिड सेंटर अचानक बंद करून सर्व साहित्य अचानक नेण्यात आले. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आले. तेथे असलेली घाण, साहित्य तसेच टाकून गेल्याने आमच्या कर्मचार्‍यांच्या जिवाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. यात वैद्यकीय अधिकार्‍यां़चा निष्काळजीपणा आढळून आला. या अधिकार्‍यांविरुध्द तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com