शिंगणापुरात 100 बेडचे कोविड सेंटर सुरु

ना. गडाख यांनी दिली भेट; रुग्ण संख्या वाढल्यास बेडची संख्याही वाढवणार
शिंगणापुरात 100 बेडचे कोविड सेंटर सुरु

शनीशिंगणापूर (वार्ताहर) -

शनिशिंगणापूर येथील भक्त निवास या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या 100 बेडच्या कोविड सेंटरला मंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देवून पाहणी केली. परिसरातील कोणत्याही रुग्णांना वैद्यकीय सेवेची कमतरता भासणार नाही याची सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.


ना. गडाख यांनी यावेळी करोना रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांना देण्यात येणार्‍या जेवण व इतर सोयी-सुविधा, औषधोपचार इ.बाबत माहिती घेतली.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेकांना संघर्ष करावा लागत आहे, या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळावे यासाठी प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांनी जे काही उपाय योजना करतील त्यास माझा पाठिंबा राहील, असे ना.गडाख यांनी नमूद केले.

शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात शासकीय अधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर्स, देवस्थानचे पदाधिकारी व विश्‍वस्त यांच्यासमवेत बैठक घेऊन या ठिकाणी तात्काळ 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत निर्देश दिले. त्यात 40 ऑक्सिजन बेड, 8 आयसीयू बेडची सुविधा असणार आहे. शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निगरानीखाली हे हॉस्पिटल सेवा देणार असून त्यासाठी औषध पुरवठा करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक पोखरणा यांना त्याचप्रमाणे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रांत व तहसीलदार यांना सूचना केल्या. या रुग्णालयातून तालुक्यातील गरजू कोविड रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

यावेळी ना. गडाख यांनी तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देऊन आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता भासत असलेल्या ठिकाणी तात्काळ जाहिरात देऊन भरती करण्यास सांगितले.

रुग्णांची संख्या वाढत राहिली तर बेडची संख्या वाढवली जाईल, असे म्हणून रुग्णांनी व नातेवाईकांनी डॉ. व कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तरीही आम्ही शासन स्तरावरून जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लवकरच ऑक्सिजन व रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर होऊन पुरवठा सुरळीत होईल.

शासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेची संपर्क करावा.

आपण सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. नियमित मास्कचा वापर, साबणाने नियमित हात धुणे, संपर्क व संसर्ग टाळणे यातूनच करोनाचे हे युद्ध आपल्या जिंकायचे आहे व आपणा सर्वांच्या सहकार्याने व मदतीने ही लढाई लढत आपण नक्कीच जिंकणार आहोत. घरी रहा, सुरक्षित रहा असे आवाहन ना.शंकरराव गडाख यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com