राहुरी फॅक्टरीच्या कोव्हिड केंद्राला अधिकार्‍यांचाच कोलदांडा

विवेकानंद नसिर्ंग होममधील कोव्हिड केंद्र वांबोरीला हलविले; नागरिक संतप्त
राहुरी फॅक्टरीच्या कोव्हिड केंद्राला अधिकार्‍यांचाच कोलदांडा
संग्रहित

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यात एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना व कोव्हिड केेंद्रातील अनागोंदी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत असताना राहुरी तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांनी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममधील कोव्हिड केंद्राला कोलदांडा दिला आहे. येथील केंद्र वांबोरीत हलवून राहुरी फॅक्टरी यथील केंद्राची दयनीय अवस्था केली आहे.

दरम्यान, यावरून आ. लहू कानडे यांनी संबंधित अधिकार्‍याची चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा होत आहे.

मागील वर्षी करोना महामारीमुळे राहुरी तालुक्यात राहुरी विद्यापीठाबरोबरच राहुरी फॅक्टरी यथील विवेकानंद नर्सिंग होममधील कोव्हिड केंद्राच्या उभारणीसाठी खासदार व आमदारांनी आपला निधी देऊन हे केंद्र सुरू करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, कसेबसे सुरू झालेल्या या केंद्रात आरोग्य सुविधा अन् साहित्याची कमतरता भासू लागली. त्यातच आरोग्य व महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांनी या केंद्राला सवतीची वागणूक देत हे केंद्र जाणीवपूर्वक बंद पाडल्याची चर्चा झाली. आता यावर्षी तालुक्यात करोना महामारीचा उद्रेक झाला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना तालुक्यात उभारलेल्या कोव्हिड केंद्रातही रुग्णांची संख्या हाऊसफुल्ल होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममधील कोव्हिड केंद्र सुरू करण्याच्या सूचना काही नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यावरून आमदार व त्या अधिकार्‍यांची चांगलीच शाब्दिक जुगलबंदी झाली.

राहुरी फॅक्टरी यथील हे केंद्र कारखाना संचलित असून त्यासाठी तेथील प्रशासन सहकार्य करीत नसल्याचे कारण सांगून त्या अधिकार्‍याने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तर यावर आमदारांनी त्या अधिकार्‍याला राहुरी तालुक्यातीलच मात्र, श्रीरामपूर मतदारसंघात येणार्‍या व प्रवराकाठच्या देवळाली प्रवरासह 32 गावाकडे राहुरी तालुका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. याउलट देवळाली प्रवरा शहरात ग्रामीण रूग्णालय का आणले नाही? असा प्रश्‍न करीत त्या अधिकार्‍याने आपले हात वर केल्याने त्या अधिकार्‍याच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. कोविड केंद्राची उभारणी अन् त्यातील सुविधा पुरविण्यासाठी त्या अधिकार्‍याने केवळ राहुरीच्याच भागात लक्ष केंद्रीत केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रवराकाठच्या 32 गावांत आरोग्य सुविधांची कमतरता

देवळाली प्रवरासह 32 गावांत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा यथे खासगी कोव्हिड केंद्राची तातडीने उभारणी करण्यात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढाकार घेतला. मात्र, शासकीय स्तरावर देवळाली प्रवरासह 32 गावांत प्रशासनाला कोव्हिड सेंटर उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे प्रवराकाठच्या गावांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com