करोना विधवा पुनर्वसनासाठी प्रत्येक तालुक्यात शासकीय समिती स्थापन

करोना विधवा पुनर्वसनासाठी प्रत्येक तालुक्यात शासकीय समिती स्थापन

पुनर्वसन समितीच्या पाठपुराव्याला यश

अकोले |प्रतिनिधी| Akole

करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र शासनाने करोनातील विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करण्याचा शासन आदेश महिला बालविकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. विधवा पुनर्वसन समितीच्या पाठपुराव्याचे हे खूप मोठे यश आहे.

तहसीलदार अध्यक्ष असलेल्या या समितीचे तहसीलदार अध्यक्ष असून एकात्मिक बालविकास अधिकारी या सचिव असतील. या समितीत गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी, समाजकल्याण विभाग आरोग्य विभाग पोलीस यांचे प्रतिनिधी असतील.त्याचप्रमाणे या समितीत एकल महिलांसाठी काम करणार्‍या संस्थेचा प्रतिनिधीही असेल.

दर महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेली ही समिती या महिलांना सर्व शासकीय योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करेल व न्यायालयाने स्थापन केलेल्या टास्क फोर्सला रिपोर्ट करतील. यामुळे तालुका स्तरावरील ग्रामीण भागातील करोनातील विधवा महिलांना सर्व शासकीय योजना मिळण्यासाठी खूप मदत होणार आहे. करोना एकल पुनर्वसन समिती 2 महिन्यापूर्वी स्थापन झाली व शासनाशी संवाद सुरू केला. आता महिला व बाल कल्याण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत अगोदर टास्क फोर्सची कक्षा रुंदावून त्यात विधवा महिलांसाठी काम करण्याचे धोरण घेतले व आता तालुका स्तरावर समितीचा निर्णय झाला. यातून या प्रश्न सोडविण्याला नक्कीच गती आली आहे.

या समितीमार्फत या महिलांना बँक पासबुक, रेशनकार्ड, जातीचे दाखले मिळवून देणे इथपासून तर निराधार पेन्शन, उद्योगासाठी कर्ज मिळवून देणे, प्रशिक्षण देणे, विविध विभागांच्या योजना मिळवून देणे अशी कामे ही समिती करणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांचे मालमत्ताविषयक अधिकार शाबूत ठेवण्यासाठी ही मदत करणार असून खासगी शाळेत शिकणार्‍या या मुलांच्या फी संदर्भात ही हस्तक्षेप करू शकेल.

या निर्णयावर एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी म्हणाले, टास्क फोर्सची कक्षा रुंदावणे व तालुका स्तरावर समिती स्थापन करणे हे दोन्ही निर्णय खूप महत्वाचे झाले असून जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील या महिलांना विविध योजना नक्कीच मिळू शकतील. या निर्णयाचे आम्ही एकल महिला पुनर्वसन समिती स्वागत करत आहे. आता शासनाने एकरकमी आर्थिक मदत देणे व रोजगार उभारून देणे यासाठी मदत करावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com