गोंधळच गोंधळ : करोना लसीसाठी नगरकरांचा जीव टांगणीला

गोंधळच गोंधळ  : करोना लसीसाठी नगरकरांचा जीव टांगणीला

अहमदनगर (प्रतिनिधी) - पंचेचाळीस प्लसच्या नागरिकांना लस देण्याचा गोंधळ नगर शहरात आज बुधवारीही कायम होता. महापालिकेने सेकंड डोस लाभार्थ्यांची यादी केंद्राबाहेर लावण्याची घोषणा केली खरी, पण नागापूर केंद्रावर यादी न पोहचल्याने गोंधळच गोंधळ दिसून आला. काही केंद्रावर लस असूनही यादीत नाव नसल्याने अनेकांना माघारी जावे लागले.

नगर शहरातील 25 हजार नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेली तरीही डोस मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळेच महापालिकच्या सातही लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे नाव यादीत असेल त्यांना केंद्रावरून फोन जाणार आहे. यादीत नाव असणार्‍यांचा लस मिळणार असल्याची माहिती अनेकांना लसीकरण केंद्रात पोहचल्यानंतर मिळाली. मात्र नव्या सिस्टमचा फटका त्यांना बसला. लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायचा असला तरी यादीत नाव नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. तर दुसरीकडे केंद्रात लस असूनही लाभार्थी आले नव्हते. त्यामुळे अनेक केंद्रात लस शिल्लक होती. असा सगळा सावळा गोंधळ शहरात दिसून आला.

नागापूरच्या केंद्रावर सकाळपासून रजिस्टर ठेवून त्यात नोंदी घेण्यात येत होत्या. रजिस्टमधील नागरिकांचे 45 दिवस पूर्ण झाले असतील त्यांनाच लस दिली जात होती. केंद्राबाहेर जमा झालेले शे-दोनशे लोकांमधून फक्त दहा लाभार्थी निघाले. बाकींच्यांना माघारी जावे लागले. त्यामुळे तेथेही लसीचे डोस शिल्लक होते. याच कारणावरून नागरिक आणि लसीकरण कर्मचार्‍यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. नगरसेवक अ‍ॅड. राजेश कातोरे यांनी लोकांची समजूत काढली. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाचा निषेध करत खंत व्यक्त केली.

सिक्युरिटीसाठी होमगार्ड

तोफखाना, माळीवाडा लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र नागापूर केंद्रावर होमगार्डची ड्युटी लावली होती. सिक्युरिटीसाठी उपस्थित असलेल्या होमगार्डला नागरिक जुमानत नसल्याचे दिसून आले. या केंद्रावर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी महिला असल्याने अनेकांनी त्यांच्याशी हुज्जत न घालता गपगुमान माघारी फिरणे पसंत केले.

नागापूरच्या केंद्रावर लाभार्थ्यांची यादी नाही. सिस्टीममध्ये फक्त दहा लाभार्थी बसले. त्यांनाच लस मिळाली. लस असूनही इतरांना लस दिली गेली नाही. ऑनलाईननंतर आता यादीचाही गोंधळ सुरू आहे. महापालिका प्रशासनाचे नियोजन ढिसाळ असून त्यांचा मनस्ताप मात्र नागरिकांना बसतो आहे.

- अ‍ॅड. राजेश कातोरे, नगरसेवक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com