लसीकरण केंद्रावर पंटरांचा ताबा

निखील वारे । कर्मचारीही दबावाखाली
लसीकरण केंद्रावर पंटरांचा ताबा

अहमदनगर (प्रतिनिधी) - ठराविक नगरसेवक किंवा त्यांचे पंटर लसीकरण केंद्रावर थांबून वशिलेबाजी करत आहेत. त्यामुळे रांगेत उभ्या असणार्‍या सामान्य जनतेला लस मिळत नाही. महापालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या दबावाला बळी न पडता सामान्य माणसांना लस मिळेल, असे नियोजन करावे अशी मागणी माजी नगरसेवक निखील वारे यांनी केली आहे.

महापालिकेचे नगर शहरात सात लसीकरण केंद्र असून पाच ठिकाणी सबसेंटर सुरू केले आहेत. वारे हे आज बुधवारी सावेडी उपकेंद्रावर गेले असता त्यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून कर्मचार्‍यांवर दबाव टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची दखल घेत त्यांनी तेथूनच थेट आयुक्तांशी संपर्क साधला. काही केंद्रावर नगरसेवक स्वत: उपस्थित राहतात तर काही केंद्रावर त्यांचे कार्यकर्ते, नातेवाईक असतात. ते लसीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांवर दबाव आणून वशिलेबाजी करतात. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या सामान्य नागरिकांना लस मिळत नाही.

कर्मचार्‍यांनी नगरसेवकांचा दबाव झुगारून लसीकरण केले पाहिजे. महापालिका आयुक्तांनीही या दबावाला बळी न पडता सामान्य जनतेला लस मिळेल याचे नियोजन करावे. ठराविक नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते अशी वशिलेबाजी करतात. त्यातून इतरही नगरसेवकांची बदनामी होते. त्यामुळे वशिलेबाजी करणार्‍या नगरसेवकांनीही स्वत:हून थांबले पाहिजे, अशी अपेक्षा वारे यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ शुटिंग करा

महापालिका, विधानसभा, लोकसभा निडणूक मतदानावेळी मतदान केंद्रावर जसे व्हिडीओ शुटिंग केले जाते, तसेच शुटींग या लसीकरण केंद्रावरही करावे. त्यातून नगरसेवकांच्या हस्तक्षेपाला चाप बसेल. सर्वसामान्य जनतेला लस मिळेल. आयुक्तांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता हा निर्णय घेतला तरच सामान्य जनतेला लस मिळेल. अन्यथा लशीकरणाचा गोंधळ असाच सुरू राहिलं, असे वारे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाचे काय?

विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनाही केंद्र भेटीत ही वशिलेबाजी निदर्शनास आली होती. त्यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रावर रजिस्टर ठेवून दिवसभराच्या नोंदी ठेवा. त्या वरिष्ठांना सादर करा, वशिलेबाजी व दबाव टाकणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाला आयुक्तांनीच ‘पेटी’बंद केल्याचे चित्र आहे. कर्मचारीही काहीच प्रत्युत्तर न देता दबावाखाली आहेत. आता ही कोंडी कशी फुटणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

कर्मचारी युनियन कुठयं!

लसीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांवर दबाव टाकून त्यांच्याकडून लस घेतली जाते. सिस्टरांना बळजबरीनेही उचलून नेले जाते असल्याचा प्रकार यापूर्वी घडला. एरव्ही कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्यानंतर धावून येणारी कर्मचारी युनियन आता कुठयं?, कर्मचार्‍यांच्या दबावासंदर्भात प्रशासनासोबत युनियन चर्चा का करत नाही? असा सवालही यावेळी वारे यांनी उपस्थित केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com