6 लाख 11 हजार नगरकरांनी घेतला नाही करोनाचा एकही डोस

लसीकरणात 60 पेक्षा अधिक वय असणार्‍यांची आघाडी
6 लाख 11 हजार नगरकरांनी 
घेतला नाही करोनाचा एकही डोस

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

कोविडचा प्रभाव कमी झाला असून जिल्ह्यात दररोज नव्याने बाधीत येणार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येणार्‍यांऐवढीच आहे. मात्र, देशात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असून केंद्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सुचना करत आहे. अशा परिस्थितीत 12 वर्षे पुढील सर्व वयोगटातील 6 लाख 11 हजार 68 लोकांनी करोनाचा एकही डोस घेतलेला नाही.

दरम्यान, जिल्ह्यात करोना लसीकरणात सर्वात चांगली कामगिरी 60 वर्षापुढील वय असणार्‍यांची झालेली असून यात 5 लाख 73 हजार 400 व्यक्तींपैकी 5 लाख 73 हजार 220 जणांनी पहिला डोस घेतला असून 4 लाख 63 हजार जणांनी 457 दुसरा तर 43 हजार 574 जणांनी बुस्टर डोसही घेतलेला आहे. या वयोगटातील अवघ्या 180 जणांचे करोना लसीकरण होणे बाकी आहे. आरोग्य कर्मचार्‍यांची करोना लसीकरणाची टक्केवारी चांगली असून आतापर्यंत 94 टक्के लोकांचे दोनही डोस झालेले आहेत. तर फ्रंटलाईन वर्करांची टक्के देखील 93 असून त्यांचे दोनही डोस पूर्ण झालेले आहेत.

18 ते 44 वयोगटातील 22 लाख 17 हजार 900 पैकी 17 लाख 14 हजार जणांनी पहिला तर 12 लाख 74 हजार जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. लसीकरणाची टक्केवारी या वर्गवारीची 57 टक्के आहे. 45 ते 59 या वयोगटातील 8 लाख 12 हजार 300 पैकी 6 लाख 82 हजारांनी पहिला तर 5 लाख 60 हजार जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी 69 टक्के आहे. तर 15 ते 17 वयोगटातील 2 लाख 38 हजारांपैकी 1 लाख 82 हजार 328 जणांनी पहिला तर 1 लाख 34 हजार जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी ही 56.44 टक्के आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली असून 1 लाख 54 हजार जणांपैकी 1 लाख 27 हजार 723 जणांनी पहिला तर 62 हजार 514 जणांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी 40.48 टक्केच आहे.

Related Stories

No stories found.