करोनाचा पिशवी बंद दुधाला फटका, पावडरचे उत्पादन वाढले

जागतिक डेअरी दिन विशेष
करोनाचा पिशवी बंद दुधाला 
फटका, पावडरचे उत्पादन वाढले
दुध

अहमदनगर (प्रतिनिधी) - राज्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सरकारला टप्प्या टप्याने टाळेबंदी करण्याची वेळ आली. यामुळे दुधाची मागणी घटली व परिणामी दुधाचे दर देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. राज्यात दैनंदिन दुध उत्पादन जवळपास 46 लाख लिटर असून टाळेबंदीमुळे या दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला. करोनाच्या भितीमुळे पहिल्या झटक्यात पिशवी बंद दुधाची मागणी निम्म्याने घटली असून ठोक विक्रीच्या दुधालाही फटका बसला आहे. यामुळे या सर्व दुधाचे रुपांतरीत वापर (पावडर) करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

राज्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. यात दुध विक्री व्यवसाय वगळण्यात आले होते. मात्र, तरीही राज्यात दुधाचे खरेदी दर प्रती लिटर 32 रूपयांवरून खासगी व सहकारी दुध संस्थांनी थेट 19 ते 20 रूपयांपर्यंत खाली आणले. 1 ऑगस्ट 2018 पासून गायीच्या दुधाला किमान 25 रूपये प्रति लिटर दर देण्याचे तत्कालीन सरकारने घोषित केले होते व राज्यातील खासगी तसेच सहकारी दुध संस्थांनी देखील ते मान्य केले होते. परंतु आता लॉकडाऊनचे कारण पुढे करून सर्वच दुध संस्थांनी दुध खरेदी दर पाडले असल्याने ग्रामीण भागातील दुध व्यवसाय मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे.

राज्यात दुधाचे दैनदिन संकलन हे 45 लाख 96 हजार प्रती दिन आहे. यात सहकारी संघाचे 7 लाख 18 हजार तर खासगी संघाचे 21 लाख 56 असे एकूण 28 लाख 74 हजार लिटर असून यासह अन्य खरेदी (राज्य अंतर्गत आवक) सहकार 62 हजार आणि खासगी 16 लाख 60 हजार लिटर असे 17 लाख 12 हजार आहेत. राज्यात दररोज संकलन होणार्‍या दुधातून सहकारी संघाच्या 1 लाख 80 लिटर पिशवी बंद दुध तर खासगी संघाची 2 लाख 78 हजार लिटर पिशवी बंद तयार करण्यात येत आहे. करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हे प्रमाण निम्म्यावर खाली आहे.

यासह सहकार संघाचे 3 लाख 89 हजार लिटर आणि खासगी संघांची 17 लाख 8 हजार लिटर ठोक विक्री होत आहे. यात देखील घट आलेली आहे. यासह दुग्धजन्य पदार्थ निर्मितीलाही मोठा फटका बसला असून सहकारी संघाचे अवघे 55 हजार लिटर आणि खासगी संघाच्या 2 लाख 89 हजार लिटर दुधातून दुग्धजन्य उपपदार्थाची विक्री होतांना दिसत आहे. जिल्ह्यात दैनदिन संकलित होणार्‍या दुधातून सर्वाधिक उत्पादन हे सध्या दुध पावडरचे करण्यासाठी होत आहे. यात सहकारी संघाकडील 1 लाख 30 हजार दुधाचे तर 13 लाख 92 हजार खासगी संघाकडील असे एकूण 15 लाख 22 हजार लिटर दुधाचे दररोज पावडर तयार करण्यात येत आहे.

................

जिल्ह्यात 2020 च्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात 4 लाख 67 हजार संकरित गायी असून 96 हजार 513 देशी गायी आहेत. यासह म्हशींची संख्या 88 हजार 399 आहे. राज्यात काही वर्षापूर्वी दुध उत्पादनात नगर जिल्ह्याचा नंबर एकवर होता. सध्याही राज्यात दुध उत्पादनात नगर राज्यात दुसर्‍या स्थानावर आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात देखील जिल्ह्यातील दुध उत्पादनावर परिणाम होत नसल्याचे दुग्धविकास विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

..................

करोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील दुधाचे दर हे 19 ते 20 रुपयांपर्यंत खाली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून राज्य सरकारने हस्तक्षेप करून दुध खरेदी दर किमान 32 रुपये प्रती लिटर करावा किंवा शेतकर्‍यांना थेट प्रतिलीटर 10 रूपये अनुदान द्यावे व कोरोना काळात अडचणीत आलेल्या दुध उत्पादक शेतकर्‍यांना आधार द्यावा.

अनिल देठे, शेतकरी संघटना.

...................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com