करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर चक्क तीस दिवसांनी आला पॉझिटीव्ह रिपोर्ट

भोकर येथील प्रकार, आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ उघड
करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर चक्क तीस दिवसांनी आला पॉझिटीव्ह रिपोर्ट

भोकर (वार्ताहर) - जिल्ह्यातील करोनाचा आलेख दररोज वाढता आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्वच शासकीय यंत्रणेवर मोठा तणाव आहे. त्यात एखादी व्यक्ती अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये करोना पॉझीटिव्ह म्हणून उपचारासाठी दाखल होते, उपचारादरम्यान दहाव्या दिवशी ती व्यक्ती मयत होते, पॉझीटिव्ह असल्याने त्यांचा नगर येथेच अंत्यविधी होतो आणि त्याच मयत व्यक्तीचा तीस दिवसानंतर त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह म्हणून येतो ! यात आरोग्य विभाग किती दक्ष आहे याचा अनुभव यावरून दिसून आला.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका 86 वर्ष वयाच्या वृद्ध व्यक्तीला दि. 16 मार्चच्या दरम्यान ताप, सर्दी व कफचा त्रास होऊ लागला. स्थानिक डॉक्टरांकडे प्रथमपोचार घेतले त्यानंतर लागलीच श्रीरामपूर येथील डॉक्टरांना दाखविले. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. आरटीपीसीआर तपासणी केली त्या तपासणीचा स्कोअर साडे एकोणीस होता. कुटुंंबियांनी त्यांना लागलीच दि. 18 मार्च रोजी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेही त्यांची अ‍ॅन्टीजेन चाचणीसह आरटीपीसीआर तपासणी झाली तेव्हापासून त्यांच्या कुटुंबियांना अद्याप अहवाल आलाच नव्हता.

अखेर दहा दिवसांच्या उपचारादरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी रिपोर्टची चौकशी केली पण त्यांना नेहमीचेच उत्तर आले ‘अद्याप रिपोर्ट आला नाही’, त्यामुळे कुटुंबीय कालपर्यंत संभ्रमावस्थेतच होते.

सदर व्यक्तीची तपासणी दि.18 मार्च रोजी झाली आणि तब्बल तीस दिवसांनंतर म्हणजे काल दि.17 एप्रील रोजी आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीत संबंधित वृद्धाचा अहवाल पॉझीटिव्ह आला. तो अहवाल काल रात्री उशीरापर्यंत नातेवाईकांना कळविण्यात आलेला नव्हता. म्हणजेच सदरची व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तीस दिवसांनी व ती व्यक्ती मयत झाल्यानंतर 21 दिवसांनी अहवाल आल्याने सर्वजण आचंबीत झाले.

त्यामुळे सरकारी कामकाज ऑनलाईन चालते तर मग ते कसे? आणि आरोग्य विभागाचा दुर्लक्षीतपणा व निष्काळजीपणा दिसून आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com