राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून काल दिवसभरात 214 रूग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून

आले. सर्वाधीक 52 रूग्ण राहात्यात आढळले असून लोणीत 37, शिर्डीत 18 तर कोल्हारमध्ये 14 रूग्ण मिळून आले आहे.

गेल्या महिन्यापासून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला असून जिल्ह्यात दुसर्या नंबरवर राहाता तालुक्यातील करोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राहाता शहरात गेल्या 24 तासात सर्वाधिक 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याखालोखाल लोणी बु. 26 तर लोणी खुर्द 11, शिर्डीत 18 रूग्ण निघाले. काही प्रमाणावर रूग्ण आज कमी दिसत असले तरी कोल्हारमध्ये रूग्ण संख्या वाढत असून 14 जणांना करोनाची बाधा झाली आहे.

राहाता तालुक्यातील 36 गावामध्ये करोनाने शिरकाव केला असून वाकडी 7 जण, साकुरी 4, राजुरी 5, प्रवरानगर 7, निमगाव 5 लोहगाव 5, दाढ 4, चितळी 4, सावळीविहीर, पिंपळस, पाथरे, या गावात प्रत्येकी 3 रूग्ण, दहेगाव, दुर्गापुर, एकरुखे, गोगलगाव, केलवड, ममदापुर, रांजणगाव या गावांमधे प्रत्येकी 2 रूग्ण तर रूई, रांजणखोल, पिंपळवाडी, निघोज, हनुमंतगाव, बाभळेश्वर, अस्तगाव येथे प्रत्येकी एक रूग्ण सापडले आहे. राहाता तालुक्यातील शिर्डी, लोणीसह खाजगी कोरोना सेंटर वर एकुन 947 रूग्ण उपचार घेत आहे.

लॉकडाऊन असतानाही राहात्यात रूग्ण वाढ

राहाता शहर सात दिवस लॉकडाऊन करूनही साखळी तोडण्यात यश आले नसून उलट रूग्णसंख्या वाढत चालली आहे. व्यवसाय बंद केले पण पालिकेने ज्या भागात करोना रूग्ण वाढ आहे त्या भागात कोणतीही काळजी घेतली नाही. शहरात सुरू असलेली औषध फवारणी कासवाच्या गतीने सुरू असून अधिक रूग्ण असलेला परिसर सिल करून तसेच तेथे योग्य ते निर्बंध लावणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. आज शहरात सर्वाधिक 52 करोना पॉझीटीव्ह रूग्ण सापडले. तरीही पालिका प्रशासन अलर्टमध्ये दिसत नसल्याच्या नगरसेवकांसह नागरिक तक्रारी करत असून पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने योग्य वेळी निर्णय होत नसून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक बोलत आहे.

टेस्टचा अहवाल तातडीने द्या

सरकारी दवाखान्यातून करोना टेस्टसाठी पाठविलेले अहवाल सरासरी चार दिवसानंतर मिळत असल्याने रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून चाचणी अहवाल तातडीने मिळावा, अशी मागणी रूग्णांचे नातेवाईक करत आहे.