कोविडच्या लाटेमुळे सलग दुसर्‍या वर्षीही सणावारांवर संकट

मुस्लीम बांधवांची घरातच ईदची नमाज तर हिंदूंची अक्षय्य तृतीयाही यंदा उपासकरुविना
कोविडच्या लाटेमुळे सलग दुसर्‍या वर्षीही सणावारांवर संकट

सलाबतपूर (वार्ताहर) - सध्या देशावर कोविड 19 च्या लाटेमुळे सणावारांवरही संकट आल्याने पंरंपरेला फाटा देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात पवित्र रमजान ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत घरातच नमाज पठण करुन ईद साजरी केली तर साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतिया सणानिमित्त पितरं जेवायला उपासकरू न आल्याने अनेकांनी गायीमुखी नैवेद्य देऊन सण साजरा केला.

गेल्या दोन वर्षापासून सर्वच धर्मातील पारंपारिक सणांवर करोनाचा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षापासून् रमजान सण हा घरातच साजरा करावा लागत आहे. मागील वर्षापासून येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण न करता मुस्लिम बांधव हा सण घरात राहूनच साध्या पध्दतीने साजरा करतात. याही वर्षी सामुदायिक नमाज पठण न करता घरातच साध्य पध्दतीने सण साजरा केला.

ईद निमित्त सरपंच अझर शेख, ग्रामपंचायत सदस्य अदिनाथ निकम बबनराव तांबे अश्पाक शेख यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. ईदबरोबरच साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतिया ही देखील योगायोगाने एकाच दिवशी आली.

वैदिक सनातन धर्मात अक्षय तृतियाच्या दिवशी आपल्या मृत पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने उपासकरू जेवू घालण्याची परंपरा आहे. मात्र करोनाच्या संकटातून वाचण्यासाठी धडपड करणारी माणसं सध्या कुणी कुणाच्या जवळ जाण्यास तयार नाही. तर पितरं जेवायला कोण येणार? अशी परिस्थिती सध्या परिसरात पाहावयास मिळाली आहे.

प्रत्येक घरात उपासकरू म्हणून जेवणारी व्यक्ती ठरलेली असते. पितृपक्ष व अक्षय तृतियाला या व्यक्तींना आपल्या पितरांच्या नावाने जेवू घातले जाते. मात्र यंदा प्रथमच करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि गावागावांत वाढलेल्या रुग्ण संख्येमूळे अनेक ठिकाणी उपासकरूंनी जेवणास असमर्थता दर्शविल्याने नाईलाजाने पितरांच्या नावाने गायीच्या मुखात नैवेद्य देण्याची वेळ आली. प्रथमच या पारंपरिक पद्धतीला फाटा दिला गेल्याचे काही जुन्या जाणकार मंडळींनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com