15 जानेवारीअखेर देशात 160 लाख टन साखरेचे उत्पादन

साखर उतार्‍यात मात्र 0.14 टक्क्यांची घट
15 जानेवारीअखेर देशात 160 लाख टन साखरेचे उत्पादन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 15 जानेवारीअखेर देशात 515 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे. यात आतापर्यंत 1 हजार 680 लाख टन उसाचे गाळप झाले असून जे गतवर्षीच्या 1 हजार 557 लाख टनाच्या तुलनेत 123 लाख टनाने ज्यास्त आहे. नवीन साखरेचे आतापर्यंतचे उत्पादन 160 लाख टन झाले असून ते गतवर्षीच्या या तारखेच्या साखर उत्पादनापेक्षा 10 लाख टनाने जास्त आहे. मात्र, सरासरी 9.50 टक्के साखर उतारा गतवर्षीच्या या तारखेच्या साखर उतार्‍याच्या तुलनेत 0.14 टक्क्याने कमी आहे.

महासंघाच्या अनुमानानुसार देशभरातील यंदाचा गाळप हंगाम एप्रिलअखेर पूर्ण होईल व त्यातून सुमारे 343 लाख टन नवे साखर उत्पादन होईल जे गतवर्षीच्या 359 लाख टनाच्या तुलनेत सुमारे 16 लाख टनाने कमी असण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख टन साखरेचे उत्पादन हे इथेनॉल निर्मितीकडे वळविले जाणार असल्याने पुन्हा एकदा यंदाच्या वर्षी एकूण साखर उत्पादन विक्रमी 390 लाख टनाच्या आसपास होणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केले आहे.

एकूण 390 लाख टन नवे साखर उत्पादन व हंगाम सुरुवातीची शिल्लक 61 लाख टन लक्षात घेता ढोबळमानाने एकूण 451 लाख टन साखरेपैकी 275 लाख टनाचा स्थानिक खप, 45 लाख टनाचा इथेनॉलसाठी वापर आणि 64 लाख टनाची अपेक्षित निर्यात लक्षात घेता हंगामअखेर सुमारे 67 लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अनुमान असून ती देशातील अडीच महिन्यांचा स्थानिक खप भागवू शकते. या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कारखानास्तरावरील साखर विक्रीदरावर कांहीसा दबाव राहून ते दर 3 हजार 150 ते 3 हजार 200 प्रति क्विंटल (एस ग्रेड) आणि 3 हजार 300 ते 3 हजार 450 प्रति क्विंटल (एम ग्रेड) राहणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थपकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.

केंद्र शासन स्तरावर इथेनॉल निर्मितीला अत्युच्च प्राधान्य देण्यात येत असले तरी इथेनॉलच्या खरेदी दरात केंद्राने नुकतीच जी वाढ केली आहे ती अपुरी आहे. कारण उसासकट इथेनॉलच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ व इतर संबंधित खर्चात झालेली वाढ लक्षात घेता इथेनॉलच्या खरेदी दरात आणखी वाढ होणे गरजेचे आहे असे दांडेगावकर यांनी म्हटले आहे. गतवर्षी देशाने केलेल्या विक्रमी 111 लाख टन साखर निर्यातीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सरकारने साखर निर्यात 64 लाख टनावर मर्यादित केल्याने आणि ती सुद्धा कोटा पद्धतीने राबविल्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या बंदर किनारा असणार्‍या राज्यातून होणार्‍या साखर निर्यातीवर विपरीत परिणाम झालेला आहे.

त्याच बरोबर इंडोनेशिया, चीन, कोरिया, मलेशिया, मध्य पूर्व तसेच आफ्रिकेतील देशात भारतीय साखरेने गतवर्षी मारलेली मुसंडी व तयार केलेले ग्राहक यंदाच्या वर्षी आपल्या हातून निसटून ते ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया या देशांनी काबीज करण्याची भीती नाईकनवरे यांनी व्यक्त केली आहे. इथेनॉल संदर्भात नजीकच्या भविष्यात काही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहेत. ज्या कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी उसाच्या रसाचा वापर केला आहे, त्यांना अतिरिक्त साखर निर्यात कोटा मंजूर करणे, खराब धान्य, मका यापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करणे, मळी निर्यातीवर अतिरिक्त निर्यात कर लावणे, डिनेचर्ड इथेनॉलच्या आयातीवरील कर कमी करणे, याच सोबत इथेनॉलचा वापर वाढण्यासाठी फ्लेक्स फ्युएल वाहन निर्मितीला प्रोत्साहन देणे, तसेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल पंपाच्या संख्येत वाढ करणे इत्यादींचा अंतर्भाव असल्याचेही नाईकनवरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com