
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
2022-23 या वर्षी देशभरात 357 लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित असून त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश कर्नाटक हे तीन राज्ये आघाडीवर राहतील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने व्यक्त केला आहे. हा अंदाज 30 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे.
महाराष्ट्रातील 188 कारखान्यांतून 134 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज असून त्या खालोखाल उत्तरप्रदेशातील 120 कारखान्यांतून 104 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. कर्नाटकातील 72 कारखान्यांत गाळप चालू असून त्यातून 60 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या तीन राज्यांशिवाय तामिळनाडूत 14 लाख टन तर गुजरात मध्ये 12 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अपेक्षित आहे.
30 डिसेंबर 2022 पर्यंत देशातील 498 साखर कारखान्यांत 1 हजार 281.82 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून 119.35 लाख टन साखर तयार झाली. यापैकी महाराष्ट्रातील 188 कारखान्यांतून 46.20लाख टन (499.46 लाख टन गाळप), उत्तर प्रदेशातील 120 कारखान्यातून 31.30 लाख टन (347.78 लाख टन गाळप) आणि कर्नाटकातील 72 कारखान्यांतून 26 लाख टन (260 लाख टन गाळप), साखरेचे उत्पादन झाले.
2021-22 या वर्षी देशातील 491 कारखान्यांतून 359.25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.चालू वर्षात (2022-23) साखर कारखान्यांची संख्या सात ने वाढली असून 30 डिसेंबर 2022 पर्यंत उसाचे गाळप (+50.65 टक्के) व साखरेचे उत्पादन (+3.65 टक्के) वाढले आहे, मात्र उसाच्या उतार्यात घट (-0.08 टक्के ) असल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.