
शिर्डी | शहर प्रतिनिधी
केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचलल्याने आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीसाठी कोईमतूर येथून खाजगी सेवा प्रणालीतील ८६० प्रवाशांना घेऊन निघालेली साईसदन एक्सप्रेस दोन दिवसानंतर गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास शिर्डीच्या साईनगर रेल्वेस्थानकावर पोहचली
दरम्यान गुरुवारी पहाटे सकाळी सहा वाजता साईसदन एक्स्प्रेस साईनगर रेल्वेस्थानकावरील प्लेटफाँर्मवर दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात सर्व रेलयात्रींचे स्वागत करण्यात आले. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचलले होते. अर्थसंकल्पात यासंबंधीचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने तीन वर्षापूर्वी दिले होते.
त्यानुसार दिल्लीहून लखनऊला जाणारी 'तेजस एक्स्प्रेस' ही देशातील पहिली खासगी रेल्वे धावली असून त्यापाठोपाठ आता कोईमतूर ते शिर्डी साईसदन एक्सप्रेस धावली असून दक्षिण भारतातील साईभक्तांना मोठया त्रासापासून दिलासा मिळाला आहे. साई सदन एक्सप्रेस मंगळवार दि.१४ जून रोजी तामिळनाडू राज्यातील कोईमतूर येथून निघून आंध्रप्रदेशातील करनुल जिल्ह्यातील धार्मिकस्थळ मंत्रालयम याठिकाणी दर्शनासाठी थांबली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास शिर्डी येथील साईनगर रेल्वेस्थानकावर पोहचली. हि रेल्वे यापुढे कायमस्वरूपी दर मंगळवारी कोईमतूर निघून गुरुवारी शिर्डीत पोहचणार आहे तर शुक्रवारी शिर्डीतून निघून रविवारी कोईमतूरला पोहणार आहे.
दोन दिवसांच्या प्रवासादरम्यान भाविकांना आलेला अनुभव कथन करतांना सांगितले की, अशाप्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून खासगी रेल्वे सेवेचा अनुभव अत्यंत सुखदायक होता. चांगल्या प्रकारे जेवणाची व्यवस्था आणी स्वच्छता आहे. सदरची रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने दक्षिण भारतातील भाविकांची गैरसोय टळली आहे. त्यामुळे दाक्षिणात्य भाविक शिर्डीला कायम साईबाबांच्या दर्शनासाठी येऊ शकणार आहे. पूर्वी शिर्डीला येण्यासाठी व्हाया मुंबई यावे लागत होते त्यामुळे आणि दिवसही खूप लागत होते. आता दोन दिवसांंत साईंचे दर्शन या माध्यमातून होणार आहे. हि बाब विलक्षणीय असल्याचे मत रेल्वेतुन प्रथम प्रवास केलेल्या भाविकांनी व्यक्त केली.
खासगी रेल्वेच्या संचालकांनी दिलेल्या वेळेपूर्वी एक तास अगोदर साईसदन एक्स्प्रेस साईनगर रेल्वे स्थानकांवर पोहचली. त्यामुळे नियोजित वेळेनुसार साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे व विश्वस्त त्यांच्या स्वागताला उपस्थित राहू शकले नाही. मात्र यावेळी भाविकांचा ढोल ताशांच्या गजरात स्वागत करुन त्यानंतर भाविकांना शिर्डीत आणण्यात आले.
दक्षिण भारतातील श्री साईबाबांच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु शिर्डीत येण्यासाठी दळणवळणाची साधने तसेच आर्थिक बजेट अशा कारणास्तव भाविक येऊ शकत नव्हते. मात्र केंद्र सरकारने खाजगी रेल्वेसेवेच्या माध्यमातून कोईमतूर ते शिर्डी साईसदन एक्सप्रेस सुरू केल्याने दक्षिण भारतातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळली आहे. याचा परिणाम थेट शिर्डीच्या अर्थकारणावर होणार असल्याने मी शिर्डी ग्रामस्थ या नात्याने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो.
कमलाकर कोते (शिवसेना नेते)