कापूस, सोयाबिनसाठी पावसाची प्रतीक्षा

शेतकरी खेळतोय धुरळ पेरणीचा जुगार
कापूस, सोयाबिनसाठी पावसाची प्रतीक्षा

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

पुरेसा पाऊस होण्याअगोदर पेरण्या करू नका, असे कृषी विभागाकडून (Department of Agriculture) वारंवार सांगितले जात असताना तसेच जिल्ह्यात अद्याप मान्सूनचा पाऊस (Rain) दाखल झालेला नसताना देखील अनेक भागात धूरळ पेरा करीत शेतकर्‍यांकडून कापूस (Cotton) व सोयाबिन लागवडीचा (Soybean Cultivation) जुगार खेळला जात आहे. इतर पिकांच्या पेरणीसाठी (Sowing of Crops) शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

हवामान खात्याकडून दररोज भाकितांचा पाऊस पाडला जात असला तरी प्रत्यक्षात पाऊस मात्र होत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. अद्याप जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे जवळपास सर्वच पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून काही भागात कापसाची लागवड तसेच सोयाबिनची पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. कापसाचा धूरळ पेरा केला तर उत्पादन वाढते, असा मागील काही वर्षांतील शेतकर्‍यांचा अनुभव आहे. त्यातूनच यावर्षीही अनेक शेतकर्‍यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे.

कापसाची एक बॅग 750 रुपयांना मिळत आहे. एका हेक्टरसाठी कापसाच्या तीन बॅग लागतात. तसेच खतांच्या तीन बॅग लागतात. एका हेक्टरवर कापूस लागवड करण्यासाठी साधारणतः 7 हजार रुपये खर्च येत आहे. झालेली पेरणी लक्षात घेता कापूस लागवडीवर शेतकर्‍यांचा मोठा खर्च झाला आहे. पावसाने दडी मारली तर हा खर्च मातीत मिसळणार आहे. सोयाबिनची परिस्थिती काही वेगळी नाही. अनेक शेतकर्‍यांनी घरगुती बियाण्यांवर भर दिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी एक प्रकारे 5 ते 6 दिवसात पावसाच्या भरवशावर मोठा जुगार खेळल्याचे दिसत आहे.

आज जून महिन्यातील 20 दिवस उलटले तरीही पाऊस झाला नाही. मागील वर्षी जून महिन्यातच निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने यंदा कापसाचे प्रस्तावित क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात सध्या कापूस लागवड होत आहे. मात्र पाऊस होत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com