
नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata
शासनाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी राज्यातील शेतकर्यांना कपाशी बियाणे पुरवठा करण्याचा कालावधी निश्चित केला असून शेतकर्यांना लागवडीसाठी 1 जून पासून बियाणे उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात शेतकरी नगदी पिक म्हणून कपाशीला पसंती देतात. चालू वर्षी ऊस पिकामध्ये शेतकर्यांना साखर कारखान्यांकडून तोडीबाबद आलेल्या वाईट अनुभवामुळे यंदा शेतकरी मोठ्या संख्येने कापूस पिकाकडे वळणार आहे. याचा अंदाज बांधून कृषि विभागाने नियोजन केले आहे. ज्या शेतकर्याकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी हंगाम पूर्व लागवड करतात, त्यासाठी लागवडही वेळेत व्हावी म्हणून शेतीची मशागत करून ठेवली आहे.
शेतकरी हंगाम सुरु होण्यापूर्वीच कपाशी लागवडीची लगबग करतात. त्यामुळे कपाशीवरील शेद्री बोन्ड आळीचा जीवन क्रम खंडित होत नाही. परिणामी शेतकर्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण यांनी बियाणे पुरवठा करण्याचा कालावधी निश्चित केला आहे. त्यनुसार उत्पादक कंपन्या व विक्रेते यांना निर्देश देऊन शेतकर्यांना बियाणे एक जून पासून लागवडीस उपलब्ध करावेत अशा सूचना परिपत्रक काढून दिल्या आहेत.
सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपनी, बियाणे वितरक, किरकोळ विक्रेते यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. त्या नुसार नेवासा तालुका कृषि विभाग, पंचायत कृषि विभागाकडून तालुक्यात भरारी पथक कार्यरत झाले आहे, तसेच गावापातळीवर कृषि केंद्रनिहाय कृषि सहायकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असून उल्लंघन होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन आहेत.