
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
न्यायालयात सुरू असलेला दावा का मागे घेत नाही या कारणावरून तालुक्यातील फुंदेटाकळी येथील मंदा भागिनाथ फुंदे यांचा आठ क्विंटल कापूस जाळून टाकल्याची घटना मंगळवारी (दि.14) पहाटे निदर्शनास आली.
याप्रकरणी लहू तुकाराम फुंदे, खंडू ज्ञानदेव फुंदे (रा. फुंदेटाकळी, ता. पाथर्डी) यांच्यावर मंदा फुंदे यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहु फुंदे व खंडू फुंदे हे तक्रारदाराच्या घरा शेजारी राहत असून जमीन वाटपावरून मंदा फुंदे यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयातून दावा काढून घेण्यासाठी संशयित हे मंदा फुंदे व त्यांच्या घरच्यांना नेहमी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देतात.
13 मार्च सोमवारी त्यांच्यात वाद झाला व न्यायालयातील दावा काढून घे, तू जर दावा मागे घेतला नाही तर तुला दाखवून देऊ आम्ही कसे आहोत असा दम दिला. त्यानंतर 14 मार्च मंगळवारी पहाटेच्या सुमारास मंदा फुंदे घराबाहेर आल्या असता बाजूच्या खोलीतून धूर झालेला दिसला. खोली ठेवलेला आठ क्विंटल कापूस जळत होता.
त्यावेळी शेजारी राहणारे लहु फुंदे, खंडू फुंदे यांनी त्याठिकाणी थांबून कोर्टातील केस मागे घे तुझ्या घरच्यांना जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. यावरून लहु फुंदे व खंडू फुंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पााथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.