
शेवगाव | Shevgav
तब्बल दीड महिन्यापासून शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्याने कापूस उत्पादनात जिल्ह्यासह राज्यात आघाडी घेतली आहे. कापसाचे कोठार म्हणून तालुक्याची नव्याने राज्यात ओळख निर्माण झाली आहे मात्र दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने कपाशीच्या या कोठारावर दुष्काळाचे संकट तयार झाल्याचे निराशजनक चित्र पाहण्यास मिळत आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील जून महिन्यात कमी पावसावर शेतकर्यांनी कपाशीची लागवड केली. त्यासाठी नांगरट, मोघडणी, रोटावेटर, फुल्या पाडणे, बियाणे, सरकी लावणे, अंतर्गत मशागत, औषध फवारणी, यासाठी तब्बल 12 ते 13 हजार रुपये एकरी खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी झालेला खर्च तरी निघेल काय? या चिंतेने शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे.तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 600 मीमी असून जून, जुलै, ऑगस्ट असा तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला असताना तालुक्यात आज अखेर केवळ 228 मीमी म्हणजे वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या 38 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात 46 हजार 866 हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली आहे.
मात्र ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर लाल्या, मावा, तुडतुडे आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटल्याने शेतकर्यांची काळजी वाढली आहे. तालुका कृषी विभागाने केलेल्या नजर नुकसान अहवालात तालुक्याच्या जवळपास सर्वच मंडळात 73 ते 76 टक्के कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा कपाशीची झालेली वाताहत झाल्याचे समोर येत आहे. तालुक्याची जीवन रेखा असलेल्या जायकवाडी जलाशयात सध्या केवळ 33.73 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने यापुढील काळात शेती सह तालुक्याच्या बहुतेक भागात पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने शेतकर्यांची काळजी वाढली आहे. तालुक्याच्या अनेक भागात कपाशीसह तूर, भुईमूग, भाजीपाला, कडधान्य, फळबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. तालुक्याच्या बहुतेक परिसरातील शेती निसर्गावर अवलंबून आहे.
मात्र यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने संकटाची तीव्रता वाढत चालली आहे. पावसाळ्यात ही अवस्था तर हिवाळा व उन्हाळ्यात संकटाची तीव्रता किती वाढणार? या चिंतेने शेतकर्यांसह सर्वांचीच काळजी वाढली आहे. शेवगाव तालुक्यात उत्पादित होणारा कापूस हा लांब धाग्याचा असल्याने या परिसरातील कापसाला कापसाच्या विविध राज्यातील बाजारपेठेत उच्चांकी भाव मिळतो. प्रत्येक वर्षी दसरा दिवाळीच्या काळात तालुक्यात कापसाच्या खरेदीला सुरुवात होते. कपाशीच्या उलाढालीवर शेतकर्यांसह येथील बाजारपेठेचेही आर्थिक गणित अवलंबून असल्याने कापसाच्या उलाढालीकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. मात्र यंदा पांढर्या सोन्यावर दुष्काळी परिस्थितीचे संकट घोंगावत असल्याने सर्वच क्षेत्राची चिंता वाढली आहे.