कापूस खरेदी केंद्राचा व्यापारी फायदा उठवणार

शासनाकडून शेतकर्‍यांची अडवणूक तर व्यापार्‍यांची सोडवणूक
कापूस खरेदी केंद्राचा व्यापारी फायदा उठवणार

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

खरीप पिकविणार्‍या शेतकर्‍यांना रब्बी पिके उभी करण्यासाठी तातडीने कापूस पडेल भावात खाजगी व्यापार्‍यांना विकावाच लागतो.

शासनाने दोन महिने उशीराने डिसेंबरमध्ये शेतकर्‍यांच्या नावावर हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू करून या खरेदी केंद्राचा व्यापारी फायदा उठवणार असल्याने शासन एक प्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक तर व्यापार्‍यांची सोडवणूक करत आहे.

खरिपातील जून महिन्यात मृग नक्षत्रात कापूस ,मका लागवड केली जाते. तीन ते साडेतीन महिन्यांत उत्पादन सुरू होते. आक्टोबर महिन्यात शासकीय हमी भावाने कापूस, मका खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे असताना शासनाने डिसेंबर महिन्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे.

शेत व्यवसायात आज उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोव्हेंबरमध्ये रब्बी गहू, हरभरा ,कांदा लागवडीची मशागत करण्यासाठी,कापूस वेचणीसह मजूर खर्चाची तरतूद करण्यासाठी शेतकर्‍यांना खाजगी व्यापार्‍यांना कापूस, मका मालाची पदरात पडेल त्या भावात विक्री करावीच लागते.

आर्थिक अडचण नसलेले शेतकरी फार थोड्या प्रमाणात आहेत. त्यांना उशीराने सुरू झालेल्या शासकीय हमी भाव खरेदी केंद्राचा लाभ होतो. त्यापेक्षा सर्वाधिक लाभ खाजगी व्यापार्‍यांना होतो. शेतकर्‍यांच्या नावावर खाजगी कापूस व्यापारी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरला हाताशी धरून कापूस विक्री करतात. शेतकर्‍यांच्या नावाने सुरू होणार्‍या खरेदी केंद्राचा लाभ शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच मिळतो.याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com