देवळाली प्रवरा परिसरात पावसाने कापूस व सोयाबिनचे मोठे नुकसान

देवळाली प्रवरा परिसरात पावसाने कापूस व सोयाबिनचे मोठे नुकसान

देवळाली प्रवरा (वार्ताहर)

देवळाली प्रवरा परिसरात गुरुवार दि.6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सुरु झालेला कधी संततधार तर कधी जोरात पडणारा पाऊस शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असल्याने अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे सोंगणी केलेले सोयाबीन पावसाने भिजले. कपाशीचा फुटलेला कापूस पावसाने भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून यंदा पावसाने शेतीची पुरती वाट लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान पावसाची ही स्थिती आणखी तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक कसे काढायचे? या विचाराने बळीराजा हवालदिल झाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने व दिवसभर कडक उनं पडत असल्याने रानं वापशावर येण्यास सुरुवात झाली होती.त्यामुळे सोयाबीन पिकाच्या काढणीची सर्वत्र झुंबड उडाली होती. त्यातच हवामान विभागाने सहा ते सात ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी नेटाने कामाला लागला होता.

गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने यंदा सोयाबीन पिकाची विक्रमी पेरणी झाली होती. परंतु यंदा विक्रमी पाऊस होऊन देखील काही ठिकाणी तग धरून असलेल्या पिकाची काढणी सुरू होती. झटपट पीक काढण्यासाठी मजुराला एकरी पाच ते सहा हजार रुपये देऊन हार्वेस्टरच्या साहाय्याने मळणी करून सोयाबीन काढण्यात येत होते. पण काल गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात झाली आणि रात्रभर कमी-अधिक प्रमाणात र पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे सोंगणी होऊन शेतात असलेले सोयाबीन भिजले आहे. तर अनेक शेतकर्‍यांचे काढणी अभावी शेतात उभे असलेल्या सोयाबीनला देखील मोठा फटका बसला आहे. पावसाचे अशा प्रकारे तीन,चार दिवस वातावरण राहीले तर सोयाबिनला कोंब फुटण्याची शक्यता आहे, असे झाले तर तेलंही गेलं अन् तूपही गेलं अशी अवस्था शेतकर्‍यांची होणार आहे.

ही अवस्था सोयाबिनची झाली असताना कपाशी पिकाची देखील अवस्था काही चांगली दिसत नाही. कारण, ज्या शेतकर्‍यांनी आगस कपाशीची लागवड केली होती त्यांची कपाशी बर्‍यापैकी फुटल्याने कापूस वेचणीला आला होता. परंतु कालच्या पावसाने या कापसाच्या वाती होऊन मोठे नुकसान झाल्याने हे पीक देखील धोक्यात सापडले आहे.

लवकर कांदा पिकाची लागवड व्हावी यासाठी ज्यांचे सोयाबीनचे रानं मोकळे झाले अशा शेतकर्‍यांची रोपासाठी रानं तयार करण्याची झुंबड उडाली होती. काहींनी तर बीयाणे देखील टाकले आहे. रात्रभर पाऊस झाल्याने या बियाणाची उगवण क्षमता कमी होणार असल्याने वापशावर पुन्हा बियाणे टाकावे लागण्याची शक्यता आहे. तर ज्यांनी अगोदर बियाणे टाकले होते त्यांची रोपे सततच्या पावसामुळे पातळ झाली असल्याने त्यांना देखील पुन्हा बियाणे टाकावे लागणार असल्याने खर्च वाढणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून उसाला कमी अधिक प्रमाणात दोन, आडीच हजार रुपयांचा भाव असल्याने व ऊस तोडीमुळे त्रस्त झालेले शेतकरी यंदा मोठ्याप्रमाणात कपाशी, सोयाबीन, कांदा, मका या पिकाकडे वळाले आहेत. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर यंदाही गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा प्रमाणा पेक्षा जादा पाऊस झाल्याने व दोन महिने उसात पाणी साचून राहिल्याने उसाची पिके पिवळी पडली असून, पाहिजे तशी वाढ झालेली नाही. तसेच जाडी देखील वाढलेली नसल्याने त्याचा वजनावर परिणाम होणार आहे. त्यातच पावसाचे असे तांडव सुरू झाल्याने रानं तोडीसाठी लवकर वापशावर येणार नाहीत. त्यामुळे यंदा देखील कांदा लागवड उशीरा होण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com