भ्रष्ट संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करा

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर सभासदांची निदर्शने
भ्रष्ट संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संचालक मंडळाची बैठक न झाल्याने सभासदांना बंद करण्यात आलेला कर्जपुरवठा,

पतसंस्थेच्या संगणक सॉफ्टवेअर आणि निवडणूक खर्चामध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्थेच्या दिल्लीगेट येथील मुख्य कार्यालयासमोर निदर्शने केली.

संस्था वाचवण्यासाठी संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. ज्येष्ठ सभासद जालिंदर बोरुडे, बाळासाहेब गाडे, किशोर गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सुहास गोरे, किरण शिरसाठ, विनोद पंडित, गणेश गर्जे, रवींद्र तवले, अंकुश शिरसाठ, संदीप कोळसे, जगदीश वाघ, सुभाष सोनवणे, कृष्णा आंधळे, गणेश कवडे, हबीब शेख, आशिष आल्हाट, शिवाजी लवांडे, आकाश ठोंबरे, नितीन गवळी, आकाश ठोंबरे, नितीन गवळी, कैलास कुलकर्णी, गणेश साबळे, राजेंद्र इंगळे आदी सहभागी झाले होते.

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 26 सप्टेंबरची सभा कोरमअभावी तहकूब झाल्याने विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजुरीविना प्रलंबित आहेत. तर सभासद संबंधांना परिपत्रकान्वये साधे कर्ज वाटप बंद करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. सध्या करोना महामारीचे संकट असल्याने सभासद व त्यांच्या कुटुंबियांस पैशाची अचानक गरज भासत आहे.

कर्जपुरवठा बंद असल्यामुळे सभासदांची या संचालक मंडळाने अडचण निर्माण केली आहे. करोनाच्या परिस्थितीमध्ये सभासदांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्यास सभासदाला कर्जाची गरज भासत आहे. सभेला 11 संचालक गैरहजर राहतात. त्याअर्थी विद्यमान संचालकांच्या कारभारावर इतर संचालकांचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. संगणक प्रणालीचे सॉफ्टवेअर व निवडणूक खर्चात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप आंदोलक सभासदांनी केला.

तर 97 व्या घटना दुरुस्ती उपविधीमध्ये ब वर्ग सभासद म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याबाबत विद्यमान संचालक मंडळाने मनमानी करून सदरचे उपविधीप्रमाणे काम न करता ब वर्ग सभासद नोंदणी बंद केली आहे. विरोधी गट एकत्र होऊन अनधिकृत व नियमबाह्य सभा घेऊन संस्थेचा दैनंदिन आर्थिक कारभार करण्याचे अधिकार देण्यात आले.

सदरचा कारभार 14 दिवस चालू होता. या 14 दिवसांत नियमबाह्य कारभार झाले या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, विद्यमान संचालकांनी मनमानी कारभार करून संस्था दिवाळखोरीत काढण्याचा घाट घातला असून, संस्था वाचवण्यासाठी संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या सात दिवसांत संचालक मंडळावर कारवाई न झाल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सभासदांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com