नगरसेवकाकडून ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी

ठेकेदाराची मनपा आयुक्त, एसपींकडे तक्रार
नगरसेवकाकडून ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व मनपाचे माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्याकडून त्यांच्या प्रभागात कामे करण्यासाठी टक्केवारीची मागणी करण्यात आल्याची व टक्केवारी पोटी दीड लाख रूपये देऊनही अतिरिक्त रकमेची मागणी करत असल्याप्रकरणी ठेकेदाराने मनपा आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठेकेदार इरफान कासम शेख यांनी ही तक्रार केली आहे. माझे स्वतःचे रजिस्ट्रेशन नसल्यामुळे विविध मजूर संस्था व शाहनवाज शेख यांच्या नावावर मी काम करतो. कित्येक वर्षापासुन मंजूर संस्था व शाहनवाज शेख यांच्या नावावरचे देयक काम करून सुध्दा मिळाले नाही. मी प्रभाग 11 मधील हातमपुरा कमला नेहरू पार्कमधील वॉल कम्पाऊंड व काँक्रीटीकरणाचे काम शेख शाहनवाज यांच्या नावावर घेतले.

ते काम पूर्ण केले. काम करताना अविनाश घुले हे कामावर येऊन मला धमकावत होते व पैशाची मागणी करत होते. हे काम माझ्या प्रभागात आहे. तू या कामाचे 15 टक्के मला दे. पैसे न दिल्यास मी कामाचे देयक काढताना अडवणूक करेल. तसेच वारंवार फोन करून धमक्या देत होते. माझ्या प्रभागात ऑनलाईन काम भरायचे नाही. तू ज्या संस्थेवर काम करत आहे, त्या संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकेल, असे म्हणत दहशत निर्माण करत आहे.

त्यामुळे नगरसेवक घुले यांची चौकशी करुन कारवाई करावी, असे शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रभागातील कामे दर्जेदार व्हावीत, याकरता आपण प्रयत्नशील आहोत. कामे दर्जेदार करण्यासाठी आपण महानगरपालिका यंत्रणेमार्फत जो ठेकेदार असेल त्यांना वारंवार सूचना देतो. मात्र, ज्या ठेकेदाराने माझ्यावर आरोप केले आहेत, त्या ठेकेदाराच्या विरोधात महानगरपालिकेतील अनेक नगरसेवकांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. त्या रागातून आपल्यावर खोटे आरोप होत असल्याचा खुलासा नगरसेवक अविनाश घुले यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com