संगमनेरात नगरसेवक मारतायेत शिधा पत्रिकांवर सही शिक्के
सार्वमत

संगमनेरात नगरसेवक मारतायेत शिधा पत्रिकांवर सही शिक्के

अधिकार नसतांना पदाचा गैरवापर

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

शिधापत्रिकेवर सह्या शिक्के मारण्याचा अधिकार तहसिलदारांना असताना संगमनेरातील काही नगरसेवकांनी मात्र हा अधिकार स्वतःकडे घेतला आहे. ते नागरिकांच्या शिधा पत्रिकेवर अधिकार नसतानाही सही शिक्के मारत असल्याचा प्रकार घडत आहे. याबाबत नागरिकांनी थेट तहसीलदारांकडे तक्रारी केल्या आहेत.

स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना संबंधित दुकानदार नगरसेवकांच्या सह्या व शिक्के आणावयास पाठवत आहे. अर्धवट माहितीवर हे दुकानदार शिधापत्रिका धारकांना संबंधित वार्डाच्या नगरसेवकांची सही व शिक्का आणावयास पाठवतात आपल्याला हा अधिकार नसल्याचे माहिती असतानाही काही नगरसेवक रेशनकार्डवर सही शिक्के मारून देत आहे.

धान्य मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची यादी बनवली जाते. खेडेगावात ग्रामपंचायत स्तरावर तर शहरातील नागरिकांसाठी नगरपालिका स्तरावर ही यादी तयार केली जाते. यात नगरसेवकांना कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही, असे असतानाही ते अनेकांच्या शिधापत्रिकांवर सह्या व शिक्के मारत आहे.

यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. काही जण आपल्यालाच अधिकार असल्याच्या अविर्भावात नागरिकांसोबत उद्धटपणाची वर्तणूक करत असल्याच्या घटनाही घडत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अनेक नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत तहसीलदार संबंधित नगरसेवकांवर कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिधापत्रिकांंवर सही शिक्के मारण्याचा अधिकार नगरसेवकांना नाहीच. ते पदाचा गैरवापर करुन सध्या शिक्के मारत आहे. याबाबत आपण तहसीलदारांकडे तक्रार केली असून संबंधितांची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवकांनी नियमानेच काम करण्याची गरज आहे.

- कैलास वाकचौरे, माजी नगरसेवक

रेशनकार्डवर सही करण्याचा अधिकार नगरसेवकांना नाही, त्यांनी सही केली तरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार नाही, माझ्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत या प्रकरणाची नियमानुसार चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

- अमोल निकम, तहसीलदार संगमनेर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com