नगरसेवक मनोज दुल्लम यांना मिळाली संधी

महापौर बाबासाहेब वाकळेंनी दिले पत्र: गुरूवारचा मुहूर्त
नगरसेवक मनोज दुल्लम यांना मिळाली संधी

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेत भाजपने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला असून सावेडीतील नगरसेवक मनोज दुल्लम यांना संधी देण्याचा निर्णय झाला आहे. नव्या बदलानुसार सभागृह नेते पदाची धुरा आता मनोज दुल्लम यांच्याकडे देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वप्नील शिंदे यांच्यानंतर हे पद पुन्हा एकदा सावेडीतच राहणार असल्याचे समजते.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कारकिर्दीत सुरूवातीचे अनेक महिने सभागृह नेते पद रिक्त होते. पुढे या पदावर नगरसेवक स्वप्नील शिंदे यांची वर्णी लागली. 4 मार्च 2019 रोजी त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. कोरोना संकट काळात या पदावर काम करण्याची अतिरिक्त संधी शिंदे यांना मिळाली. आता राजकीय गाडा पूर्वपदावर आल्याने सभागृह नेता पदाची खांदेपालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सावेडीतील भाजप नगरसेवक मनोज दुल्लम यांना या पदावर संधी देण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे पत्रही दुल्लम यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुल्लम हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आले होते. सावेडीच्या श्रमिकनगर वार्डातून ते भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. आता त्यांना सभागृह नेता पद देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

.................................कोट.....

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभागृह नेते पदाचे पत्र दिले आहे. गुरूवारी मी सभागृह नेते पदाचा पद्भार हाती घेणार आहे. भाजपने संधी दिल्याने मी सर्वाचे आभार व्यक्त करतो.- मनोज दुल्लम, नगरसेवक.

.....

भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे सभागृह नेते पदासाठी मनोज दुल्लम यांचे नाव सुचविले आहे. मावळते सभागृह नेते शिंदेही बैठकीला उपस्थित होते. त्यानुसार दुल्लम यांना सभागृह नेते पदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे. - बाबासाहेब वाकळे, महापौर.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com