नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आकाश पवार (रा. गोपाळ गल्ली, केडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याने येवले यांना फोन करून ‘मला तुझी सुपारी मिळाली असून, तुझा मर्डर करणार आहे’, असा दम दिला. तशी तक्रार येवले यांनी दिली होती. कोतवाली पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आकाश पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे समोर आल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी सांगितले.

दरम्यान, नगरसवेक येवले यांना तिघांकडून जिवे मारण्याची धमकी देत हॉटेलसमोर गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव) यांच्या फिर्यादीवरुन स्वतंत्र गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला वर्ग करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शिवसेना शिष्टमंडळाचे एसपींना निवेदन

नगरसेवक येवले यांना जीवे मारण्याची धमकी देणे तसेच त्यांच्या खुनासाठी तीन कोटीची सुपारी देण्यामागचा मास्टर माईंड कोण? याचा शोध घ्यावा, येवले यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना जिल्हाअध्यक्ष विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, नगरसेवक येवले आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com