वाईन शॉप खुले होताच मद्यपींची झुंबड

राज्य उत्पादन शुल्कचा आदेश धाब्यावर
वाईन शॉप खुले होताच मद्यपींची झुंबड

अहमदनगर|Ahmedagar

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी आदेश काढून परवानाधारक दारू विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 यावेळेत घरपोहच दारू विक्री करण्यास परवानगी दिली. परंतु, नगर शहरातील वाईन शॉप चालकांनी हे नियम धाब्यावर बसून बुधवारी सकाळी 7 नंतर अर्धे शटर उघडून मद्य विक्री सुरू केली.

मद्यासाठी तहानलेल्यांची खरेदीसाठी झुंबड उडाली. वाईन शॉप खुले झालेले असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे दुर्लक्ष केले. काही ठिकाणी पोलिसांनी धाव घेत दुकानदारांना दंडात्मक कारवाई केली.

संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. परंतु मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी आदेश काढून जिल्ह्यातील परवानाधारक दारू विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोहच मद्य विक्री करण्यास तसेच देशी, विदेशी मद्यांच्या ठोक विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ बंधनकारक केली होती.

जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदीचे कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील परमीट रूम, बार यांना आपल्या दुकानातून दारू विक्रीस बंधने घातली आहेत. यामुळे तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. परंतु, उत्पादन शुल्कच्या आदेशाने घरपोहच दारू मिळणार असल्याने मद्यप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला.

परंतू, बुधवारी सकाळ उजाडताच नगरमध्ये वेगळेच चित्र पाहयला मिळाले. कोतवाली, तोफखाना, एमआडीसी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक वाईन शॉप अर्धे शटर उघडे करून मद्य विक्री करताना दिसून आल्या. मद्यपींनी खरेदीसाठी गर्दी केली. पुन्हा मिळते का नाही म्हणून काहींनी जास्त प्रमाणात मद्य खरेदी केल्याचे चित्र दिसले. असे असले तरी उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून यावर पांघरून घातले.

मार्केटयार्ड परिसरात करोनाला आमंत्रण

नगरच्या मार्केटयार्ड परिसरात बुधवारी भाजीपाला खरेदी- विक्रीसाठी नागरिकांची शेकडोच्या संख्येने गर्दी केली होती. पहाटे चार वाजेपासून गर्दी होती. रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. याकडे महापालिकेच्या भरारी पथकांसह कोतवाली पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. दिवसेंदिवस शहरासह जिल्ह्यात करोना रूग्णांची वाढ होत असताना मार्केटयार्ड परिसरात होत असलेली गर्दी करोनाला आमंत्रण देणारीच आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com