उंबरे गावावर करोनाचे सावट

दोन महिन्यात 19 जणांचा मृत्यू; 1300 जणांच्या चाचणीत 418 बाधित
उंबरे गावावर करोनाचे सावट

उंबरे (वार्ताहर) -

राहुरी तालुक्यातील उंबरे गावावर करोनाचे सावट पडले आहे. दोन महिन्यात करोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

उंबरे गावात करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे दोन महिन्यात 19 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण राहुरी, नगर, पुणे, औरांगाबाद आदी ठिकाणी उपचार घेत आहेत. तर काही राहुरी विद्यापीठ येथे उपचार घेत आहेत.

करोनाला सुरुवात झाल्यापासून यावर्षी या महामारीत उंबरे गावाला चहूबाजूने विळखा घातला आहे. करोनाच्या चाचणीमुळे अनेक रूग्ण आढळून येत आहेत. गावात एकाच कुंंटुंबातील तीन व्यक्ती, काही घरातील दोन व्यक्ती एकदमच गेल्यामुळे तर काहींचा एकुलता एक मुलगा दगावल्यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावरती पडले आहेत. या मोठ्या संकटामध्ये राहुरी तालुक्यात सर्वात जास्त उंबरे गावात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

दोन महिन्याच्या कालावधीत किमान 19 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर अनेकजण जागा मिळेल त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यापासून दीड हजार महिला, पुरुषांना लसीकरण करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी तेराशे नागरिकांची चाचणी केली असून त्यामध्ये 418 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व त्यांचे सर्व पथक सेवा देण्यासाठी कार्यरत असून अनेक रूग्ण जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबातील लोक मात्र, इतरत्र फिरत असल्याने करोनाचा प्रसार वाढत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

सध्या गावपातळीवर कुठलेही पथक कार्यरत नसून याकडे लक्ष कोण देणार? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. निवडणुका आल्या तर अनेक सेवाभावी संस्था काही उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तेवढ्यापुरतेच काम करीत आहेत. मात्र, या संकटकाळात सर्व सेवाभावी संस्था व राजकीय पुढारी गायब झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. संकटाच्या काळात गावाकडे कोणी लक्ष देत नसतील तर राजकीय पुढारी व जनतेमध्ये मिरविणार्‍या व चमकोगिरी करणार्‍या काही सेवाभावी संस्था काय कामाच्या? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उंबरे गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश जाधव, डॉ. विजय मेहेत्रे, डॉ. संयुक्ता खळदकर, एम. एन. बर्डे, पी. व्ही. साळवे, सुचित्रा ढोकणे, एम. एस. तापकीर, संजय कपूर, पी. एल. बोगा, जेम्स ससाणे, यु. जी. जगताप, राजू नगरे, एस. बी. गडाख, संजय ढोकणे, बाबासाहेब आवारे हे वैद्यकीय पथक रात्रंदिवस याठिकाणी नागरिकांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. विशेष म्हणजे उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उंबरे, ब्राह्मणी, वांबोरी, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, गुंजाळे, कात्रड, कुक्कडवेढे, बाभूळगाव अंतर्गत तेरा गावे असून त्यांची लोकसंख्या 60 हजार आहे.

प्रत्येक ठिकाणाहून अनेक नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. परंतु या अंतर्गत असणार्‍या गावाची लोकसंख्या मोठी असून अनेकांना या लसीचा या गावातील लाभार्थी असणार्‍या गावाला फायदा मिळाला पाहिजे. त्यामुळे तालुक्यातील ज्याच्या भागातील उपकेंद्र असतील, त्याच ठिकाणी प्रत्येकाने लसीकरणामध्ये सहभागी झाले तर उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रावर सर्वच लसीकरणाचा भार येणार आहे.

उंबरे येथे करोना पॉझिटिव्ह संख्या वाढत असून उंबरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या गावातील बाधित असलेल्या रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था दोनच दिवसात सुरू करणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश जाधव यांनी दिली. ते म्हणाले, ज्यांना काही त्रास वाटत असेल त्यांनी घरात न राहाता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. त्यामुळे आपल्या कुटुंबात व गावात कोणालाही त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेतली तर करोना आटोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com