करोना महामारीचा राहुरी तालुक्यात विस्फोट

72 तासात 433 जणांना करोनाची बाधा; लसीकरण ठप्प; रेमिडेसीवर इंजेक्शनचा तुटवडा
करोना महामारीचा राहुरी तालुक्यात विस्फोट

राहुरी (प्रतिनिधी) -

राहुरी तालुक्यात करोना महामारीचा पुन्हा विस्फोट झाला. गेल्या 72 तासात तालुक्यात 433 जणांना करोनाची बाधा

झाल्याचे आढळून आले. यात महिलांचे बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तर राहुरी शहरात तीन दिवसात 90 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात करोना महामारीचा मोठा फैलाव झाला असल्याचे दिसून येते. दरम्यान, तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केेंद्रात सुरू असलेले लसीकरण ठप्प झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर रेमिडेसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून रूग्णांच्या नातेवाईकांना सुमारे 12 ते 14 रुपये मोजून काळ्या बाजारात इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आरोग्य व महसूल प्रशासन आणि पोलीस खाते करोना महामारी नियंत्रणात आणण्यास अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागालाही करोना महामारीचा विळखा अगदी घट्ट बसला आहे. राहुरी शहरात तीन दिवसात करोनाबाधित रूग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. तर टाकळीमिया, ब्राम्हणी, वांबोरी, राहुरी विद्यापीठ या महत्वाच्या गावांमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी वाढती करोना रूग्णांची संख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिकांनी आर्थिक फटका सहन करत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश पाळण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, राहुरी तालुक्यात पोलिसांच्याच मेहेरबानीने अवैध धंद्यासह दारूविक्री करणार्‍यांना पायबंद बसला नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी राहुरी पोलिसांच्या सहकार्यानेच छुप्या मार्गाने दारूविक्री सुरू असून मटका व जुगाराचे अड्डेही खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे अवैद्य धंदेवाल्यांना विशेष परवानगी आहे काय? त्यांच्याकडून करोनाचा फैलाव होणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

त्यामुळे आता प्रशासनाने एक तर आम्हाला परवानगी द्यावी, अन्यथा अवैध धंदेवाल्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. अनेक बेरोजगार तरुणांनी मोठं भांडवल गुंतवून नवीन उद्योग सुरू केले आहेत. कुठेतरी व्यवसाय सुरू झाला असताना दुसर्‍या टप्प्यातील करोना महामारीमुळे दुकाने पुन्हा बंद करण्याची वेळ नवीन तरूण व्यावसायिकांवर आली आहे. दरम्यान या महामारीत स्वतःच्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी करणार्‍या व्यावसायिकांकडून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नियम पायदळी तुडवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.

दरम्यान, तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 1 हजार 900 लस उपलब्ध झाली आहे.

आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार, शुक्रवार) लसीकरणासाठी असतात. मात्र, लसीचा होणारा तुटवडा परिणामी लस प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास विलंब होतो. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यावर तीन दिवसा व्यतिरिक्त लसीकरण करावे लागते.

आजमितीला राहुरी तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात 1900 लस उपलब्ध झाली आहे. यामध्ये उंबरे-210, मांजरी-460, देवळाली प्रवरा-570, टाकळीमिया-260, बारागाव नांदूर-140 व गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 260 लस उपलब्ध आहे.

तालुक्यात काही कोविड सेंटरमध्ये रूग्णांसह नातेवाईकांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र,त्याकडे पोलीस, आरोग्य व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. तर तालुक्यातील काही खासगी रूग्णालयचालक असलेल्या डॉक्टरांनी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोरखधंदा सुरू केल्याने सामान्य रूग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हेळसांड होत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर नियंत्रण आणण्यात प्रशासन कुचकामी ठरले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com